Marathwada Flood – शेतकऱ्यांना मदत करा, साहित्यिकांचे आवाहन

‘आभाळ फाटले, ठिगळं तरी किती लावणार!’ असे म्हणून चालणार नाही. लिहित्या संवेदनशील हातांनी आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी यथाशक्ती मदत केली पाहिजे, असा विचार मांडून 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष विश्वास पाटील यांनी एक लाख रुपये मुख्यमंत्री निधीसाठी दिले आहेत. पाटील यांच्यासह भारत सासणे, अर्जुन डांगळे, प्रेमानंद गज्वी, अशोक नायगावकर, डॉ. महेश केळुसकर, अॅड. राजेंद्र पै, डॉ. सुलभा कोरे, अभिराम भडकमकर, श्रीकांत बोजेवार, मुरलीधर नाले, अशोक मुळे, अशोक राणे यांनी शेतकऱ्यांना मदत द्या असे आवाहन केले आहे.

गजानन महाराज संस्थानकडून 1 कोटी 11 लाखांची मदत

राज्यातील अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांसाठी शेगांव येथील श्री गजानन महाराज संस्थानने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 1 कोटी 11 लाखांचा धनादेश सुपूर्द करून सामाजिक बांधिलकी जपली आहे. राज्यात अनेक जिह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. पूरबाधितांना मदतीसाठी शासनाने आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत श्री गजानन महाराज संस्थानने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस हा सहयोग निधी दिला. हा धनादेश संस्थानच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

जिल्हाधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांना फिल्डवर उतरण्याचे निर्देश

मराठवाडय़ातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी मुख्यमंत्री फडणवीस यांनी ऑनलाईन संवाद साधला. केवळ आदेश देत बसू नका तर स्वतः फिल्डवर उतरून उपाययोजना करा, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांसह सर्व संबंधित अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. कृषी, मदत व पुनर्वसन, महसूल, जलसंपदा आदी विभागांच्या अधिकाऱ्यांना पूरग्रस्त भागांमध्ये कामाला लावण्यात आले आहे. मराठवाडय़ाच्या आसपासच्या जिह्यांमधील अधिकाऱ्यांनाही तिथे पाचारण करण्यात आले आहे.