मराठवाडा पदवीधर संघ- महाविकास आघाडीचा एकदिलाने प्रचार आणि भाजपचे गर्वहरण

मराठवाडा पदवीधर मतदारसंघात ‘चमत्कार’ होणार! यावेळी निकाल वेगळाच लागणार! अशा रेशीमलडी सोडणाऱया भाजपच्या अहंकाराचे पदवीधरांनी गर्वहरण केले. दुसरीकडे महाविकास आघाडीने कोणत्याही अपप्रचाराकडे लक्ष न देता एकदिलाने काम केल्यामुळेच तिसऱयांदा विजयाचा गुलाल सतीश चव्हाण यांच्या अंगावर उधळला.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली तेव्हाच ही लढाई अर्धी जिंकली असे मानण्यात येत होते. कारण सतीश चव्हाण यांचा विद्यार्थ्यांशी असलेला संपर्प, शैक्षणिक संस्थांमध्ये त्यांच्याबद्दल असलेला विश्वास या त्यांच्या जमेच्या बाजू. दुसरीकडे भाजपमध्ये उमेदवार निवडीवरून सुरुवातीपासूनच गोंधळ होता. पक्षाच्या राष्ट्रीय महामंत्री पंकजा मुंडे यांनी प्रवीण घुगे यांचे नाव समोर करताच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या वेळचे पराभूत उमेदवार शिरीष बोराळकर यांचा पत्ता फेकला. एवढेच नाहीतर फडणवीसांनी बोराळकर यांच्यासाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावली. फडणवीसांनी बोराळकरांची उमेदवारी लादताच भाजपमधील त्यांच्याविरोधातील फळी अलगद प्रचारातून बाजूला झाली. सुरुवातीला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आले. फडणवीसही एकदा आले. त्यानंतर भाजपचा कोणताही नेता फिरकला नाही. त्यामुळे बोराळकर एकटेच पडले होते. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसने संपूर्ण प्रचारकाळात एकदिलाने प्रचार केला.

आपली प्रतिक्रिया द्या