राज्यात मेरिटाइम विद्यापीठाची स्थापना करणार, महाराष्ट्र मरिनर्स असोसिएशनचा निर्धार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली

साडेसातशे किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा असलेल्या महाराष्ट्रात म्हणावा तसा मरिन व्यवसाय वाढलेला नाही. त्या पार्श्वभूमीवर राज्यात मरिन व्यवसाय भरभराटीस आण्यासाठी महाराष्ट्र मरिनर्स असोसिएशनने कंबर कसली आहे. त्यानुसार पुढील पाच वर्षांत सरकारच्या माध्यमातून राज्यात मेरिटाइम विद्यापीठाची स्थापना करणे, मेरिटाइम इकॉनॉमिक झोन, इंडिया मेरिटाइम सर्व्हिसेस, कोस्टल शिपिंग इनलँड वॉटरवेज तयार करण्याचा निर्धार केला आहे.

जगभरातील मेरिटाइम क्षेत्रात काम करणार्‍या महाराष्ट्राच्या चारशेहून अधिक जहाजचालक कॅप्टननी (मरिनर्स) एकत्र येत 2014 मध्ये राज्याच्या मेरिटाइम विकासासाठी महाराष्ट्र मरिनर्स असोसिएशनची स्थापना केली होती. त्याच्या पाचव्या वर्धापनदिनानिमित्त आज चेंबूरच्या एकर्स क्लबमध्ये विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी असोसिएशनने पुढील पाच वर्षांसाठी महाराष्ट्र मेरिटाइम व्हिजन सादर केले. मेरिटाइम नेशन म्हणून आजही हिंदुस्थान जगात पुढे येऊ शकलेला नाही, पण मरिनर्स असोसिएशनमुळे ते शक्य होऊ शकते असे मत नॅशनल शिपिंग बोर्डचे चेअरमन प्रदीप रावत यांनी स्पष्ट केले. यावेळी अदानी पोर्टचे सीईओ कॅप्टन उमेश अभ्यंकर, कॅप्टन सुरेश दिवेकर, कॅप्टन पुरुषोत्तम बर्वे, कॅप्टन सुधीर नाफडे, कॅप्टन गिरीष फडणीस, कॅप्टन संदीप शिवांगी, असोसिएसनचे अध्यक्ष कॅप्टन केदार चौधरी, उपाध्यक्ष कॅप्टन स्वानंद पाटणकर, कॅप्टन हर्षद पटवर्धन, कॅप्टन नितीन बोंद्रे, कॅप्टन अशुतोष अपांडकर, कॅप्टन गजानन करंजीकर, डॉ. जयश्री फडणवीस यांनी मरिन व्यवसायाच्या विकसाबाबत मार्गदर्शन केले.

सरकार काही करेल त्याची वाट पाहू नका

महाराष्ट्राच्या मरिन विकासासाठी सरकारी स्तरावर काम सुरू आहे. पण आपल्यासाठी सरकार काही करेल आणि मग आपला मरिन व्यवसाय वाढेल याची वाट पाहू नका. दिवसेंदिवस स्पर्धा वाढत चालली आहे. त्यामुळे तुमच्याकडे जे काही आहे ते सुरू करा असे आवाहन इंडियन शिप ओनर्स असोसिएशनचे सीईओ अनिल देवळी यांनी केले.