
गेल्या दीड वर्षापासून कोरोनाच्या धसक्याने अक्षरशः लुडकलेला बाजार यावर्षी मात्र कोरोना नियंत्रणात असल्याने पुन्हा एकदा फुलला आहे. अवघ्या चार दिवसांवर दिवाळी आल्याने स्वागत खरेदीसाठी दुकाने सजली आहेत. यातच खरेदीसाठी ‘विकेंड’चा मुहूर्त साधत बाजारपेठांमध्ये ग्राहकांची झुंबड उडत आहे. सजावटीच्या साहित्यासह फराळ सामानाच्या किमती सुमारे दहा टक्क्यांनी वाढल्या असल्या तरी कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने ग्राहकांमध्ये खरेदीचा मोठा उत्साह दिसत आहे.
मुंबईत गेल्या वर्षी मार्चमध्ये कोरोनाने शिरकाव केल्यापासून गेल्या 20 महिन्यांत सर्वच सण-उत्सव भीतीच्या सावटाखाली आणि नियम पाळून अत्यंत साधेपणाने गर्दी न करता साजरे करण्यात आले. मात्र सद्यस्थितीत मुंबईत कोरोना पूर्ण नियंत्रणात आल्याने आणि तिसऱया लाटेची शक्यताही धुसर झाल्याने दीपावलीच्या ‘उत्सवाला उत्साहाचे उधाण’च आले आहे. महागाई झाली असली तरी नागरिक दीपावली जल्लोषात साजरी करण्याच्या मुडमध्ये आहेत. ‘स्ट्रिट शॉपिंग’सह सोने-चांदीची दुकाने, कपडे आणि गाडय़ांच्या दुकानात ग्राहकांची मोठी गर्दी होत आहे. अनेक मॉलसह ‘फेस्टिव्ह सेल’ ऑनलाइन विक्रेत्यांनी ऑफर जाहीर केल्याने ऑनलाइन शॉपिंगही जोरात आहे.
दिवाळी पार्श्वभूमीवर गेल्या आठवडय़ात 40 ते 50 रुपये किलोने मिळणारा झेंडू आताच किलोला शंभर रुपये झाला आहे. त्यामुळे साहजिकच हारांचे, किरकोळ विक्रीचा भाव वाढला आहे. हा दर किलोला दीडशेपर्यंत जाण्याचा अंदाज आहे.
– मंगेश पवार, फुल विक्रेता, प्रभादेवी
गेल्या वर्षी कोरोनामुळे मालाची विक्रीच झाली नाही. यातच यावर्षी लॉकडाऊनमुळे नोकरी गमावलेल्या अनेकांनी छोटे व्यवसाय सुरू केल्याने स्पर्धा प्रचंड वाढली. परिणामी मातीच्या पणत्या, रांगोळीला अपेक्षित भाव मिळत नाहीय.
– विजय कलवार, रांगोळी विक्रेता
उत्साहातही जबाबदारीचे भान
कोरोना नियंत्रणात असला तरी गर्दी वाढल्यास धोका असल्याने ग्राहक-विक्रेत्यांकडून कोरोना खबरदारीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केल्याचे दिसत आहे. दुकानात ‘मास्कशिवाय प्रवेश नाही’ असे फलक ठळकपणे लावण्यात आले आहेत. शिवाय सॅनिटायझरची व्यवस्थाही करण्यात आली आहे. तुरळक लोक वगळता मास्कचा वापर होताना दिसत आहे.

































































