मार्लेश्वर गिरीजा देवीचा विवाहसोहळा यावर्षी गर्दीविना, कोरोनामुळे भक्तांना प्रवेशबंदी

संपूर्ण महाराष्ट्रात जागृत देवस्थान म्हणून परिचित असलेल्या संगमेश्वर तालुक्यातील मार्लेश्वर देवस्थानच्या यात्रोत्सवाला प्रारंभ झाला असला तरी यावर्षी कोरोनामुळे सर्व विधी भक्तांच्या गर्दी विना केवळ देवस्थान समिती आणि मानकरी यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहेत. यात्रेला भक्तांनी येवू नये असे सांगण्यात आले असल्याने देवरुख आगारातर्फे एकही जादा बस फेरी या मार्गावर सोडली जाणार नाही. मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर म्हणजेच 14 जानेवारीला श्री देव मार्लेश्वर आणि आणि साखरपा येथील गिरीजादेवी यांचा कल्याणविधी म्हणजेच विवाहसोहळा संपन्न होणार आहे. मात्र हा सोहळा देखील मानकरी वऱ्हाडी आणि देवस्थान समिती अशा मोजक्या लोकांच्या उपस्थितीतच संपन्न होणार आहे. 12 जानेवारी रोजी सुरु झालेले यात्रेचे विधी 17 जानेवारी पर्यंत सुरु राहणार आहे.

सह्याद्रीच्या उंच उंच कड्यांवर, निसर्गाच्या सान्निध्यात असणारे मार्लेश्वर देवस्थान देवरुख पासून 18 किमी अंतरावर आहे. या देवस्थांचा समावेश महाराष्ट्र शासनाने क वर्ग पर्यटनस्थळ म्हणून केला आहे. यामुळे खऱ्या अर्थाने या देवस्थान परिसर विकासाला चालना मिळाली. महाराष्ट्रातील नावलौकीक पावलेले देवस्थान अशी मार्लेश्वरची ख्याती असल्याने वर्षभर येथे भक्तगणांसह पर्यटकांचा ओघ सुरुच असतो. यावर्षी मात्र हा परिसर भक्तांविना सुनासुना रहाणार आहे.

हे देवस्थान खास करुन ओळखले जाते ते जानेवारीत संपन्न होणाऱ्या मार्लेश्वर यात्रोत्सवासाठी. यावर्षीचा उत्सव 12 ते 17 जानेवारी या कालावधीत संपन्न होणार आहे. 12 तारखेला देवाला हळद लावणे, घाणा भरणे असे धार्मिक विधी संपन्न झाले आहेत. 13 जानेवारी रोजी आंगवली येथील मठाची वार्षिक यात्रे ऐवजी केवळ विधी संपन्न झाले आहेत. याच दिवशी रात्री मार्लेश्वरची पालखी, आलेल्या दिंड्या यजमान आणि मानकऱ्यांसह शिखराकडे प्रयाण करते.

14 जानेवारीला पहाटे साखरपा येथील गिरीजादेवीच्या पालखीचे मानकऱ्यांसह आगमन झाल्यावर मुलगी पाहणे, पसंती, मागणी टाकणे, मानपान असे विधी संपन्न झाल्यावर दुपारी 12 नंतर श्री देव मार्लेश्वर आणि गिरीजादेवी यांचा विवाहसोहळा मंगलाष्टकांच्या साथीने मोठ्या थाटामाटात संपन्न होणार आहे. मात्र यावर्षी देवाचा हा थाटमाट पहायला भक्तगणांना येण्यास बंदी घालण्यात आली आहे. विवाहसोहळा संपन्न झाल्यानंतर 15 जानेवारी रोजी देवतांच्या पालख्या शिखरावरुन खाली मारळ नगरीत येणार आहेत. यात्रोत्सवासाठी भक्तांना येण्यास बंदी घातल्याने ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या