मारणे गँगची भिती दाखवून बांधकाम व्यावसायिकाला मागितली 1 कोटींची खंडणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुण्यात बांधकाम व्यावसायिकाला कुख्यात गुंड गजा मारणे टोळीची भीती दाखवून तब्बल एक कोटींची खंडणी मागणाऱ्याविरुद्ध खंडणी विरोधी पथक दोनने गुन्हा दाखल केला आहे .राकेश विठ्ठल मारणे (रा. रिजेंट पार्क) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी 47 वर्षीय बांधकाम व्यावसायिकाने तक्रार दिली आहे. ही घटना जून ते नोव्हेंबर 2022 कालावधीत घडली आहे.

तक्रारदार बांधकाम व्यावसायिक असून, सॅलिसबरी पार्क परिसरात त्यांच्या बहुमजली इमारतीचे बांधकाम सुरू आहे. जूनपासून आरोपी मारणे हा त्यांच्या साईटवर व ऑफिसवर जात होता. तुमच्या इमारतीचे चार मजले अनधिकृत असून, त्याबाबत पुणे महापालिकेकडे तक्रार करण्याची भिती दाखवत होता. ते मजले पाडल्यानंतर 20 कोटींचे नुकसान होईल असे त्याने सांगितले. यावेळी त्याने कुख्यात गजा मारणे टोळीची भिती दाखवत 1 कोटींची खंडणी मागितली. याप्रकरणी तक्रार दाखल होताच आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त संदीप कर्णिक, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, एपीआय चांगदेव सजगणे पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण, उपनिरीक्षक मोहनदास जाधव, विजय गुरव, सचिन अहिवळे, अमोल पिलाणे, प्रदीप शितोळे, शैलेश सुर्वे, विनोद साळुंके, राहूल उत्तरकर, संग्राम शिनगारे, किशोर बर्गे, चेतन शिरोळकर, आशा कोळेकर, यांनी केली.