वऱ्हाड निघालं ई–बाईकवरून

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपला लग्नसोहळा इतरांपेक्षा हटके असावा अशी सगळ्यांचीच ईच्छा असते. कोटय़वधी रुपयांची उधळपट्टी केल्यामुळे काही लग्न सोहळ्यांची चर्चा होते, तर काही लग्नसोहळे असे असतात जे आपल्या साधेपणामुळे सगळ्यांची मने जिंकतात. सध्या अशाच एका ईकोफ्रेंडली लग्नाची सगळीकडे जोरदार चर्चा आहे. या लग्न सोहळ्याचे वैशिष्टय़ म्हणजे नवरदेव घोडा किंवा गाडीऐवजी चक्क इलेक्ट्रिक बाईकवरून मंडपात पोहोचला.

माधुरी आणि आदित्य हे दोघे बालपणीचे मित्र. त्यांच्या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघेही पर्यावरणप्रेमी असल्यामुळे आपल्या लग्नात पर्यावरणाची हानी होणार नाही, याची त्यांनी काळजी घेतली. लग्नमंडपात सजावटीसाठी देखील प्लॅस्टिकचा कमी कमी वापर करण्यात आला होता. फुलांऐवजी एकमेकांच्या गळ्यात त्यांनी तुळशीच्या माळा घातल्या. लग्नात आलेल्या पाहुण्यांना मिठाईऐवजी झाडांचं रोपटं भेट म्हणून दिले. 2 लाखांहून कमी रुपयांत त्यांचा हा लग्नसोहळा पार पडला.

  • आयएएस अधिकारी सुप्रिया साहू यांनी या जोडप्याच्या ईकोफ्रेंडली लग्नाची अनोखी कहानी ट्विटरवर शेअर करताच ती झपाटय़ाने व्हायरल झाली आहे. नेटिझन्सने माधुरी आणि आदित्यचे काैतुक करत त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.