
सामना प्रतिनिधी । आष्टी
लग्नाचा मंडप वाऱ्याने उडाल्याने सहा वऱ्हाडी जखमी झाल्याची घटना मंगळवारी अंभोरा, ता. आष्टी येथे घडली.
आष्टी तालुक्यातील अंभोरा येथील बोकडे वस्तीवर खाकाळ, मराठे यांच्या विवाहाचे आयोजन करण्यात आले होते. मंगळवारी दुपारी साडे बारा वाजता हा विवाह होणार होता. नवरदेव परण्या गावातून वाजत गाजत मांडवाकडे येत होता. लग्न घटिका जवळ आली होती. अक्षताचे वाटप झाले. भटजींनी लग्नाची तयारी केली होती. मंडपात वऱ्हाडी नवरदेवाची वाट पाहत वऱ्हाडी मांडवात बसले होते. अवघ्या काही वेळातच लग्न लागणार होते परंतु अचानक जोरदार वावटळ मांडवात घुसली. मंडपाचे कापडी छत वाऱ्याबरोबर आकाशात उडाले, छताबरोबर लोखंडी पाईप जमिनीतून उपसले गेले आणि वर उडाले. मंडपात हाहाकार उडाला. मंडपसाठी असलेले लोखंडी पाईप व लाकडी फळ्या डोक्यावर पडल्याने सहा जण जखमी झाले.
बाबुराव थोरात, चांदबी सय्यद, बंडू शिंदे, अंबादास पवार, पुष्पा पंडित यांनाही उपचारासाठी नगरला पाठवण्यात आले. उत्तम थोरात या वृद्ध व्यक्तीस जास्त मार लागला. त्यानंतर दुसरा छोटा मंडप उभारून त्यात विवाह लावण्यात आला.





























































