दर्ग्यातील गुप्तधनासाठी विवाहितेचा छळ

19


सामना प्रतिनिधी, चंद्रपूर

धक्कादायक, क्रूर आणि अघोरी अशा शब्दांनी वर्णन करता येईल, अशी अंधश्रद्धेशी निगडित एक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातल्या सावरी-बीडकर गावात उजेडात आली आहे. यात गुप्तधनासाठी विवाह करून पत्नीचा अतोनात छळ करण्यात आला असून 12 तास उपाशी ठेवून कासवाची पूजा करायला लावणाऱ्या सासरच्या लोकांवर आता गुन्हा दाखल झाला आहे. गुप्तधनासाठी एखाद्या नवविवाहितेचा असा छळ होण्याची आणि जगासमोर येण्याची राज्यातील ही पहिलीच घटना आहे.

चिमूर तालुक्यात सावरी या गावातील समीर गुणवंत कारेकर या मुलाशी गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरीच्या वाघाडे कुटुंबातील सविताचे ऑगस्ट 2018 मध्ये लग्न झाले. लग्नाच्या पहिल्याच तिची आजेसासू घसरून पडली व मरण पावली. यामुळे नवविवाहितेला अपशकुनी ठरवून तिच्या छळाला सुरुवात झाली. पहिल्याच रात्री नवविवाहिता सविता हिला अडीच वाजता उठून घराच्या अंगणात असलेल्या पुरातन दर्ग्याची स्वच्छता व दर्गा धुण्यास सांगण्यात आले. याच दर्ग्यात असलेल्या जिवंत कासवाला अंघोळ घालून पूजाअर्चना करत सुमारे दोन तास मुरमुरे खाऊ घालण्यास सांगण्यात आले. याच दरम्यान समीरच्या अंगात ताजुद्दीनबाबा आला व त्याने हळद सुटण्याच्या आधीच सविताला बेदम मारहाण करीत चटके देण्यास सुरुवात केली. यात सासू-सासरेही सहभागी होते. कारेकर यांच्या घराला उंच संरक्षक भिंत असल्याने आत सुरू असलेल्या प्रकाराबाबत शेजारी अनभिज्ञ राहिले. याशिवाय सूर्योदय ते सूर्यास्त या काळात नवविवाहितेला उपाशी ठेवून हे कृत्य करायचे असल्याने पहिल्या दिवसापासूनच सविताची उपासमार केली गेली.

घरातील पुरातन दर्ग्याच्या खाली असलेले गुप्तधन या सर्व विधींमुळे आपोआप वर येईल, हे या अनन्वित छळामागचे मूळ कारण होते. छळाचा हा प्रकार सतत सुरू राहिला. या दरम्यान सविताकडील मोबाईलदेखील काढून घेण्यात आल्याने तिचा माहेरशी संवाद संपला. सविताला या दरम्यान समीरचे आपल्यासोबतचे तिसरे लग्न असल्याची धक्कादायक माहिती देखील मिळाली. या छळाची वार्ता सविताच्या वडिलांपर्यंत पोचल्यावर त्यांनी कारेकर यांचे घर गाठत मुलीला माहेरी नेले. या छळविषयी सविताच्या वडिलांनी पोलीस -वनविभागाला माहिती दिली. मात्र यावर कुठलीही कारवाई झाली नाही. दरम्यान समीर चौथा विवाह करणार असल्याची माहिती मिळाल्याने वाघाडे कुटुंब धडा शिकविण्यासाठी पुढे सरसावले. अखेर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना याविषयी माहिती दिली. त्यामुळं हे प्रकरण समोर आलं.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं हे प्रकरण पोलीस अधीक्षकांना समजावून सांगितलं. यातील गांभीर्य लक्षात आणून दिलं. आणि तेवढ्याच गांभीर्यानं पोलीस अधीक्षकांनी हे प्रकरण हाताळत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यामुळं शेगाव पोलीस ठाण्यात अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी कारेकर कुटुंबीय व पीडित परिवार राजकीयदृष्ट्या मातब्बर व सुशिक्षित कुटुंबं समजली जात असल्याने अंधश्रद्धेचा पगडा समाजात किती खोलवर व घातक रुजला आहे, याचाही नमुना पुढे आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या