विवाहितेला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार, फसवणुकीचा गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोपरगाव शहरातील एका विवाहितेवर लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची घटना घडली आहे. आरोपीने लग्न झालेले असतानाही दुकानात नोकरीला असणाऱ्या 34 वर्षीय विवाहितेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर गेल्या पाच महिन्यापासून लैंगिक अत्याचार केले आहेत.

प्रविण सोपान भुजाडे (रा.आपेगांव, ता.कोपरगांव) असे आरोपीचे नाव असून त्याच्याविरोधात कोपरगाव शहर पोलिसांनी बलात्कार, लुबाडणूक व फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. तक्रारीनुसार, पीडित विवाहिता 2019 मध्ये प्रवीण यांच्या दुकानामध्ये नोकरीस लागली होती. त्यानंतर प्रवीणने लग्नाचे आमिष दाखवून तिला फसवून बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर कोपरगांव आयडीबीआय बँकेत पीडितेचे अकाऊंट उघडुन चेक बुकवर फिर्यादीच्या सह्या घेतल्या आणि चेकबुक स्वतःकडे ठेवून घेतले. पीडितेचे पॅनकार्ड, आधार कार्ड, रेशन कार्ड, गॅस कार्ड, बँक पासबुक अशी मूळ कागदपत्र स्वत:कडे ठेवून घेतली. फिर्यादीचे 8 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने बँकेत ठेवतो, असे म्हणून तिच्याकडून दागिने घेतले आणि ते गहाण ठेवले, असे तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे.

पीडितेकडून मुलाची फी भरण्यासाठी 27 हजार रुपये घेऊन प्रत्यक्षात 10 हजार रुपये फी भरून बाकीचे पैसे स्वत:कडे ठेवले. प्रवीण याने त्याच्या पहिल्या लग्नाबद्दल लपून ठेवले होते. पीडितेला याची माहिती मिळाल्यानंतर तिने प्रवीणला त्याच्या लग्नाबाबत विचारणा केली. तेव्हा त्याने पीडितेला मारहाण करून हाकलून दिले, असं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. पीडितेच्या तक्रारीवरून प्रवीण विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.