
पिंपरी-चिंचवडमधील वैष्णवी हगवणे प्रकरण ताजे असताच मुरबाडमध्येही हुंडाबळीची धक्कादायक घटना घडली आहे. नवीन घर घेण्यासाठी २० लाख रुपये माहेरून घेऊन ये असा तगादा लावून सासरची मंडळी विवाहितेला मारहाण करत होती. शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून अखेर छकुली केदार या महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी पती कैलास हरड याला किन्हवली पोलिसांनी अटक केली असून अन्य तिघांचा शोध घेण्यात येत आहे.
धसईच्या पिंपळघर गावातील छकुली केदार हिचा विवाह शहापूरच्या खरीवली गावातील कैलास हरड याच्यासोबत 1 मे 2025 रोजी झाला होता. नवीन घर घेण्यासाठी सासरची मंडळी छकुलीकडे ‘तू तुझ्या बापाकडून 20 लाख रुपये घेऊन ये’ असा तगादा लावला होता. वारंवार सांगूनही विवाहितेने पैसे न दिल्याने सासरची मंडळी संतप्त झाली. ‘माझे वडील वडापावची गाडी लावत असून 20 लाख रुपये देण्याची त्यांची ऐपत नाही’ असे तिने वारंवार सांगितले. तरीही पैशांसाठी तगादा सुरूच होता. तो सहन न झाल्याने अखेर छकुली हिने मृत्यूला कवटाळले.
आता सहन होत नाही, मला घरी घेऊन जा!
शारीरिक आणि मानसिक छळ सुरू असल्याने हे आता सहन होत नाही, मला घरी घेऊन जा असे छकुलीने आईला फोन करून सांगितले. त्यानंतर दोन दिवसांनी गळफास घेऊन छकुलीने आत्महत्या केली. आईच्या तक्रारीवरून किन्हवली पोलीस ठाण्यात सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी पती कैलास हरड याच्या मुसक्या आवळल्या. शहापूर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 17 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली