गप्टीलने ‘हिटमॅन’ रोहितला केले ओव्हरटेक, आता कोहलीच्या ‘विराट’ विक्रमावर नजर

सलामीवीर फलंदाज मार्टीन गप्टील याच्या दणदणीत खेळीच्या बळावर न्यूझीलंडने अखेरच्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 7 विकेट्सने पराभव केला आणि पाच सामन्यांची मालिका 3-2 अशी जिंकली. गप्टीलने या लढतीत 7 चौकार आणि 4 उत्तुंग षटकारांच्या मदतीने 71 धावांची खेळी केली. या खेळीसह त्याने टीम इंडियाचा ‘हिटमॅन’ रोहित शर्मा याला ओव्हरटेक केले आहे.

आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत आता मार्टीन गप्टील दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरच्या टी-20 मध्ये पाचवी धाव घेताच त्याने रोहित शर्माला मागे सोडले. आता त्याची नजर पहिल्या स्थानावर असणाऱ्या टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याच्या विक्रमावर आहे.

दुखापतीनंतर न्यूझीलंडच्या संघात पुनरागमन केलेल्या मार्टीन गप्टील याने 99 आंतरराष्ट्रीय टी-20 लढतीत 2839 धावा चोपल्या आहेत. तर रोहित शर्माच्या नावावर 108 लढतीत 2773 धावांची नोंद आहे. या यादीमध्ये पहिल्या स्थानावर असणाऱ्या विराट कोहलीच्या नावावर 85 लढतीत 2928 धावांची नोंद आहे.

सर्वाधिक षटकार

दरम्यान, मार्टीन गप्टील याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 4 षटकारांची आतिषबाजी केली. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक 139 षटकार ठोकण्याचा विक्रम गप्टीलच्या नावावर आहे. या यादीत रोहित शर्मा 127 षटकारांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

न्यूझीलंडचा विजय

अखेरच्या टी-20 लढतीत न्यूझीलंडपुढे विजयासाठी 143 धावांचे आव्हान होते. यजमान संघाने 15.3 षटकात 3 विकेट्स गमावून हे आव्हान पार केले. गप्टील व्यतिरिक्त कॉन्वे याने 36 आणि ग्लेन फिलिप याने 34 धावांचे योगदान दिले.

आपली प्रतिक्रिया द्या