शहीद झालेल्या जवानाचा मृतदेह सात महिन्यांनी सापडला, हिमवादळामुळे झाला होता बेपत्ता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशाच्या सीमेचं प्राणपणाने रक्षण करताना हिमवादळात बेपत्ता झालेल्या जवानाचा मृतदेह सापडल्याचं वृत्त आहे. जवळपास सात महिन्यांपूर्वी हा जवान पेट्रोलिंग करतेवेळी हिमवादळाच्या तडाख्यात सापडला होता.

या जवानाचं नाव राजेंद्र सिंह (35) असं असून ते गढवाल रायफल्सचे हवालदार होते. जम्मू कश्मीर इथल्या गुलमर्गमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ ते तैनात होते. साधारण सात महिन्यांपूर्वी सिंह गस्तीवर असताना तिथे आलेल्या हिमवादळाच्या तडाख्यात सापडून बेपत्ता झाले होते. जवळपास चार महिने शोध घेतल्यानंतर राजेंद्र सिंह हे बॅटल कॅज्युअल्टी म्हणजेच युद्धात शहीद झाल्याची घोषणा मे महिन्यात करण्यात आली होती. पण, बर्फात दबल्यामुळे त्यांचा मृतदेह सापडला नव्हता. सिंह यांच्या पत्नीला उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी सात्वंनपर संदेश पाठवला होता. पण, सिंह यांच्या पत्नीने मात्र मृतदेह न सापडल्यामुळे ते शहीद झाले असावेत, हे मान्य करण्यास नकार दिला होता.

सिंह बेपत्ता झाल्यानंतर सात महिन्यांनी देहराडून येथे त्यांचा मृतदेह आढळला आहे. आता या मृतदेहावर संपूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. राजेंद्र सिंह हे  2001मध्ये गढवाल रायफल्समध्ये दाखल झाले होते. घरातील सर्वात मोठा भाऊ असलेल्या सिंह यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे.