शहीद जवानाच्या वीरमातेला शिवसेनेकडुन अन्नधान्य व आर्थिक मदत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी येथील शहीद जवान कवीचंद्र भालेराव यांच्या आई रुखमाबाई भालेराव (78) यांना शिवसेनेचे जिल्हा प्रमुख व आमदार संतोष बांगर यांनी अन्नधान्य व पाच हजार रोख आर्थिक मदत आज 30 एप्रिल रोजी पिंपळदरी येथे  जाऊन  दिली.

रुखमाबाई भालेराव यांचा एक मुलगा शहीद झाला आहे. तर दुसरा मुलगा प्रकाश हा लॉकडाऊनमध्ये परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे अडकला असून मजुरी करतो. त्यांच्या जवळ सध्याच्या परिस्थितीत कोणीही नव्हते. या सर्व परिस्थितीची माहिती शिवसेना आमदार संतोष बांगर यांना कळताच त्यांनी पिंपळदरी कडे धाव घेऊन  शहीद जवानाच्या आईला अन्नधान्य व पाच हजाराची आर्थिक मदत केली. आजी, काळजी करू नकोस, यापुढे देखील अडचण आल्यास शिवसेनेकडून सर्व ती मदत केली जाईल असे सांगितले. यावेळी यांच्यासोबत शिवसेनेचे नगरसेवक सुभाष बांगर, गंगाधर पोले, जयकुमार भगत यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.