
सामना ऑनलाईन, लॉस एंजलिस
एक्स मेन, व्हुल्वरिन, स्पायडर मॅन, हल्क, आयर्न मॅन, ब्लॅक पँथर अशा अनेक सुपरहिरोंचा जन्मदाता असलेल्या स्टॅन ली यांचं निधन झालं. ते ९५ वर्षांचे होते. स्टॅन ली यांनी भूतलावर राहून मार्व्हलचं काल्पनिक विश्व तयार केलं होतं. या काल्पनिक विश्वातील सुपरहिरो हे आजही जगभरातील करोडो लोकांचे ह्रदयावर अधिराज्य गाजवतायत. स्पायडरमॅन या सगळ्यांमधला अत्यंत यशस्वी सुपरहिरो ठरलेला आहे. कॉमिक्स, मालिका आणि चित्रपट अशा तीन स्वरुपात स्पायडरमॅनने असंख्यवेळा प्रेक्षकांचं, वाचकांचं आणि खासकरून बच्चेकंपनीचं मनोरंजन केलं आहे.
— stan lee (@TheRealStanLee) November 12, 2018
स्टॅन ली अमेरिकेतील अत्यंत प्रसिद्ध व्यक्तींमध्ये गणना होणारे कलाकार होते. मार्व्हल कॉमिक्सने तयार केलेल्या काही चित्रपटांमध्ये ते पाहुणा कलाकाच्या रुपातही बघायला मिळाले होते. अत्यंत सौम्य आणि मिश्कील स्वभावाच्या स्टॅन ली यांनी त्यांच्या पात्रांवर केलेल्या प्रेमामुळे शेवटपर्यंत मार्व्हलचं विश्व कसं विस्तारत नेता येईल याचा विचार केला होता. स्टॅन ली यांचे सगळे सुपरहिरो हे अत्यंत संवेदनशील आणि मानवतावादी दृष्टीकोणातून विचार करणारे दाखवले आहेत. त्यांनी खरंतर सामान्य माणसं हीच खरी सुपरहिरो आहेत हे वारंवार दाखवण्याचा प्रयत्न केला.
२८ डिसेंबक १९२२ साली जन्मलेल्या स्टॅन ली यांची पहिली निर्मिती होती ती फॅन्टॅस्टीक फोरची. मार्व्हल कॉमिक्स आणि फॅन्टॅस्टीक फोरचा जन्म सोबतच झाला. त्यानंतर ली यांनी स्पायडर मॅन, हल्क,डॉक्टर स्ट्रेंज, डेडपूल, कॅप्टन अमेरिका या सारखी शेकडो पात्र निर्माण केली. कालांतराने मार्व्हल कॉमिक्सने या सगळ्यांना एकत्र आणत अव्हेंजर्स नावाची एक टीम तयार केली. अव्हेंजर्स चित्रपटाचेही अनेक भाग आत्तापर्यंत प्रदर्शित झाले आहेत. डीसी कॉमिक्स आणि स्टॅन ली यांच्या मार्व्हल कॉमिक्सने अमेरिकेत अशरक्ष: धुमाकूळ घातला होता. आत्ताही हॉलीवूडमध्ये डीसी विरूद्ध मार्व्हल असा संघर्ष सुरू आहे.


























































