
केरळमधील कोझिकोडे येथे निपाह विषाणूमुळे दोघांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर हा विषाणू वेगाने पसरू नये याची पुरेपूर काळजी घेण्यात येत आहे. कुन्नूर, वायनाड आणि मनपुरम जिह्यात अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर तब्बल 7 ग्रामपंचायतींना कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहेत. केरळ सरकारने संबंधित परिसरातील सर्व शाळा, महाविद्यालये, बँका आणि सरकारी संस्था बंद ठेवण्याचे निर्देश शिक्षणमंत्री व्ही. सिवनकुट्टी यांनी दिले आहेत.
पुण्यातील नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरॉलॉजीचे पथक आज कोझिकोडे येथे दाखल होणार असून या विषाणूच्या अनुषंगाने संशोधन करणार असल्याची माहिती राज्य सरकारने दिली आहे. कंटेन्मेंट झोनमधील नागरिकांना मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले असून केवळ औषधे आणि जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणारी दुकाने सकाळी 7 ते सायंकाळी 5 या वेळेत सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे. निपाह विषाणू आढळलेल्या गावात जमावबंदी तसेच विविध कार्यक्रम सादर करण्यास मनाई करण्यात आली आहे.
पुण्याचे पथक काय करणार?
केरळमध्ये दाखल होणाऱया पुण्याच्या नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरॉलॉजी पथकासाठी कोझिकोडे वैद्यकीय महाविद्यालयात एक प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे. या ठिकाणी निपाहची चाचणी आणि वटवाघळांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
कोझिकोडे येथे जिल्हा आरोग्य प्रशासन आणि पंचायत विभागाने सावधगिरी म्हणून निपाह विषाणूचा संशय असलेल्या दोन पंचायतींमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व खबरदारी घेतली आहे.
काल रात्री केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी तातडीची बैठक बोलावली. निपाहचा सामना करण्याच्या दृष्टीने आवश्यक प्रयत्नांबाबत चर्चा झाली.
कोझिकोडे येथे कॉण्टॅक्ट ट्रेसिंगचे काम सुरू करण्यात आले आहे.
केरळमध्ये आतापर्यंत निपाह विषाणूची चार प्रकरणे समोर आली. त्यात दोघांचा मृत्यू झाला. पहिला मृत्यू 30 ऑगस्टला तर दुसरा मृत्यू 11 सप्टेंबरला झाला. दोन मृतांचे नमुने पुण्याच्या नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरॉलॉजीमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.




























































