
मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिकसह राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाने मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रभागनिहाय प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चुका असल्याचे निदर्शनास आले आहे. यावरून राजकीय पक्षांकडून प्रश्न उपस्थित होऊ लागताच राज्य निवडणूक आयोगाने मतदार याद्यांतील चुकांना महानगरपालिकांना जबाबदार ठरवत हात झटकले आहेत.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राज्याच्या विधानसभा मतदार यादीत मोठ्या प्रमाणात दुबार व मयत मतदारांची नावे आहेत. तसेच एका घरात शेकडो मतदार राहत असल्याचे आढळून आले होते. महापालिका निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेने जी प्रभागनिहाय यादी प्रसिद्ध केली आहे त्यामध्येही मोठय़ा प्रमाणात चुका असल्याचे आढळून आले आहे. यावरून राजकीय पक्षांकडून मतदार याद्या चलाखीने विभागल्या गेल्याचा आरोप होऊ लागला आहे. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने संबंधित महापालिकांनाच मतदार यादीतील घोळाला जबाबदार ठरवत त्याच्या दुरुस्तीची जबाबदारी पालिकांवर टाकली आहे.
27 नोव्हेंबरपर्यंत सूचना नोंदवा
महानगरपालिका निवडणुकांसाठी मतदार याद्यांचे प्रभागनिहाय विभाजन संबंधित महानगरपालिका आयक्तांच्या स्तरावर करण्यात आले आहे. त्यामुळे याबाबत हरकती आणि सूचना किंवा काही तक्रारी असल्यास त्या 27 नोव्हेंबरपर्यंत संबंधित महानगरपालिकेत दाखल कराव्यात, असे राज्य निवडणूक आयोगाने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.
- मतदार याद्यांचे प्रभागनिहाय विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱया चुका तसेच मतदाराचा प्रभाग बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही पालिकेच्या यादीत नाव नसणे याबाबत पालिका आयुक्तांकडे दाद मागता येईल, असे आयोगाने म्हटले आहे.
- विधानसभा यादीप्रमाणेच मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे आणि पत्ते कायम ठेवले जातात. प्रभागनिहाय मतदार याद्यांमध्ये नावांचा समावेश, नावे वगळणे, नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरुस्ती आदी कार्यवाही केली जात नाही, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.
प्रभागनिहाय विभाजन पालिका स्तरावर
राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी मतदार याद्यांकरिता 1 जुलै 2025 हा अधिसूचित दिनांक निश्चित केला आहे. त्या दिवशी अस्तित्वात असलेल्या विधानसभेच्या मतदार याद्या या निवडणुकांसाठी वापरण्यात येणार आहेत. या मूळ मतदार याद्या भारत निवडणूक आयोगाने तयार केल्या आहेत. त्यांचे प्रभागनिहाय विभाजन संबंधित महानगरपालिका स्तरावर महानगरपालिका आयुक्तांच्या देखरेखीखाली करण्यात आले आहे. त्यानुसार संबंधित महानगर पालिकेच्या ठिकाणी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
- मतदार यादीतील आपले नाव https://mahasecvoterlist.in/ObjectionOnClick/SearchName या संकेतस्थळावर शोधता येईल. त्यावर 27 नोव्हेंबर 2025 पर्यंत हरकती आणि सूचना दाखल करता येतील.
































































