मालाडमध्ये आगीत दुकान जळून खाक

एका दुकानाला आग लागल्याची घटना गुरुवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास मालाड पश्चिमेकडील सोमवार बाजारमध्ये घडली. या आगीत दुकान जळून खाक झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या दुकानाला ही आग नेमकी कशामुळे लागली, याबाबतची माहिती अद्याप मिळू शकली नाही. आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या सहा ते सात गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आग विझविण्यासाठी रात्री उशिरापर्यंत युद्धपातळीवर प्रयत्न सुरू होते. आजूबाजूला मोठ्या संख्येने दुकाने असल्यामुळे आग वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, आग कशामुळे लागली यासंदर्भात अग्निशामक दलाचे जवान आणि मालाड पोलीस पुढील तपास करत आहेत.