
50 कोटींच्या खंडणीसाठी जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपातून मटका किंग सुरेश भगतचा भाऊ विनोद भगतची पुराव्याअभावी निर्दोष सुटका झाली. विनोद भगतने जयेश संगोईला फोन कॉल करून मटका क्वीन जया भगत व तिचा मुलगा हितेशला तुरुंगातून बाहेर काढण्यासाठी 50 कोटींची खंडणी मागितली होती. ही खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची तसेच तुरुंगात सडवण्याची धमकी दिली होती.
विनोद भगतने जया भगतचा नातेवाईक असलेल्या जयेश संगोईला 50 कोटींच्या खंडणीसाठी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप होता. याप्रकरणी ऑक्टोबर 2009 मध्ये विनोद भगतविरुद्ध मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यानंतर 3 फेब्रुवारी 2010 रोजी विनोद भगतविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. मात्र खंडणी व जीवे मारण्याच्या धमकीबाबत सरकारी पक्षाने न्यायालयात सबळ साक्षी-पुरावे सादर केले नाहीत. त्याआधारे मुलुंडचे महानगर दंडाधिकारी पी. के. राऊत यांनी आरोपी विनोद भगतला भारतीय दंड विधान आणि फौजदारी प्रक्रिया संहितेच्या विविध कलमांतर्गत गुह्यांतून निर्दोष मुक्तता केली.


































































