
माथेरान शार्लोट लेक तलावात तीन तरुण बुडाल्याची घटना आज घडली. नवी मुंबईतील रहिवासी असलेले हे तिन्ही तरुण पर्यटनासाठी माथेरानमध्ये आले होते. शार्लोट लेक तलावात पोहण्यासाठी उतरले असता तिघे बुडाले. त्यापैकी एकाचा मृतदेह सह्याद्री आपत्कालीन रेस्क्यू टीमने पाण्यातून बाहेर काढला आहे. अन्य दोन तरुणांचा रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता.
रविवारीची सुट्टी असल्यामुळे नवी मुंबईतील कोपरखैरणे परिसरामधील दहा तरुणांचा एक ग्रुप माथेरान फिरण्यासाठी आला होता. हे तरुण माथेरान येथील प्रसिद्ध असलेल्या पिसरनाथ मंदिर येथील दर्शन घेऊन जवळील परिसरातील शार्लोट लेक तलावाच्या किनारी मौजमजा करीत होते. सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास यातील एक तरुण पाण्यात उतरत असताना पाय घसरून पडला. त्याला वाचविण्यासाठी अन्य काही तरुणांनी पाण्यात उडी मारली. व्यवस्थित पोहता येत नसल्याने सुमित चव्हाण, आर्यन खोब्रागडे, फिरोज शेख हे तरुण पाण्यात बुडाले.
या घटनेची माहिती माथेरान पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी बचाव पथकासह घटनास्थळी धाव घेतली. माथेरान सह्याद्री आपत्कालीन रेस्क्यू टीमने तातडीने बचाव कार्य सुरू करून एका तरुणाला बेशुद्ध अवस्थेत पाण्यातून बाहेर काढले. त्याला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.


























































