
गेले पाच महिने पावसाळी सुट्टीवर गेलेली सर्वांची लाडकी माथेरानची राणी गुरुवार ६ नोव्हेंबरपासून डौलात धावणार आहे. या टॉयट्रेनला अखेर मुहूर्त मिळाला असून रेल्वे प्रशासनाने आज अधिकृत घोषणाही केली. माथेरानची राणी पुन्हा ट्रॅकवर येणार असल्याने बच्चे कंपनी खूश झाली आहे. पर्यटनाला त्यामुळे चालना मिळणार असून नागमोडी वळणे घेत नेरळ ते माथेरानदरम्यान निसर्गाचा मनमुराद आनंद लुटता येणार आहे.
दरवर्षी पावसाळयात माथेरानची राणी बंद ठेवली जाते. मात्र यंदा तुफान पाऊस आणि वादळी वारे याचा जोरदार तडाखा NOM नेरळ-माथेरान रेल्वे मार्गाला बसला. अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या. खड्डेही पडले. पावसाळा लांबल्याने टॉयट्रेनचे वेळापत्रकच बिघडले. रेल्वे प्रशासनाने डागडुजीची तसेच अन्य तांत्रिक कामे आता पूर्ण केली असून गुरुवारपासून नव्या ढंगात पर्यटकांचे आकर्षण असलेली ही ट्रेन पुन्हा सेवेत रुजू होणार आहे. नेरळ ते माथेरान ३१ किलोमीटरचा अंतर आहे.
विस्टाडोमचे आकर्षण
नेरळ ते माथेरानदरम्यान जुम्मापट्टी, वॉटर पाइप, अमन लॉज व माथेरान अशी चार स्थानके आहेत. तीन दिवसांपूर्वीच माथेरानच्या राणीची चाचणी घेण्यात आली होती. त्यानंतर सुरक्षा विभागाने हिरवा कंदील दर्शवला असून आता प्रत्यक्षात पर्यटकांना प्रवास करायला मिळणार आहे. या गाडीला एकूण सहा डबे आहेत. त्यात फर्स्ट क्लासचा एक डबा असून त्यासाठी ३४० रुपये मोजावे लागतील. सेकंड क्लासचे तिकीट फक्त ९५ रुपये एवढे आहे. विशेष विस्टाडोम हे प्रमुख आकर्षण असणार आहे. काचेच्या खिडक्या, काचेची छत यामुळे माथेरानचा निसर्ग डोळ्यांत साठवता येईल. मात्र त्यासाठी ७५० रुपये तिकीट ठेवले आहे. त्याशिवाय एक डिलक्स डबादेखील असून त्याचे तिकीट १ हजार ७०० रुपये एवढे आहे.
































































