मथुरा बोट दुर्घटना: मृतांचा आकडा 15 वर, शोधकार्य अद्याप सुरूच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशातील मथुरा येथे यमुना नदीत झालेल्या भीषण बोट दुर्घटनेतील मृतांचा आकडा आता 15 वर पोहोचला आहे. प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी बचाव पथकाला नदीपात्रात आणखी दोन मृतदेह सापडले आहेत. अद्याप एका व्यक्तीचा शोध सुरू असून पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने शोध मोहीम तीव्र केली आहे.

पोलीस अधीक्षक (ग्रामीण) सुरेश चंद्र रावत यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी मथुरेच्या बंगाली घाट परिसरात एका महिलेचा मृतदेह हाती लागला असून तिची ओळख मोनिका अशी पटली आहे. याशिवाय, दुसरा मृतदेह वृंदावनमधील देवराहा बाबा घाटाजवळ सापडला आहे. हा मृतदेह 22 वर्षीय यश उर्फ युवराज भल्ला याचा असल्याची खात्री झाली आहे. विशेष म्हणजे, दुर्घटनेच्या काही मिनिटे आधीचा एक व्हिडिओ समोर आला असून यामध्ये यश भक्तांच्या पथकासोबत उत्साहात ढोल वाजवताना दिसत होता.

यश हा मूळचा लुधियानातील जगराओन येथील रहिवासी असून तो एक विद्यार्थी होता. तो फावल्या वेळेत ‘श्री बांके बिहारी क्लब’च्या भजन पथकासाठी ढोलक वाजवण्याचे काम करत असे. याच कामासाठी तो या तीर्थयात्रेत सहभागी झाला होता. दरम्यान, या अपघातातील पंकज मल्होत्रा (40) नावाचा व्यक्ती अद्याप बेपत्ता असून त्यांचा शोध घेण्यासाठी नदीपात्रात मोहीम राबवली जात आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात आणि भाविकांमध्ये मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.