
जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या 2025 ते 2027 या नव्या हंगामाला हिंदुस्थान आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेने प्रारंभ होतेय. त्याचबरोबर या मालिकेचे माईंडगेमसुद्धा सुरू झाले असून, ऑस्ट्रेलियाचा माजी धडाकेबाज फलंदाज मॅथ्यू हेडनने ही मालिका हिंदुस्थानच जिंकणार असे भाकीत वर्तवत आपले हिंदुस्थानप्रेम दाखवलेय. दुसरीकडे माजी कर्णधार मायकल क्लार्क तसेच आफ्रिकन वेगवान गोलंदाज डेल स्टेनने ही मालिका अत्यंत थरारक होणार आणि यात यजमान इंग्लंड 3-2 ने हिंदुस्थानवर मात करणार अशी भविष्यवाणी वर्तवत मालिकेचे वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला आहे.
नुकत्याच जागतिक कसोटी अजिंक्यपदाचा मान दक्षिण आफ्रिकेने मिळवत 2023-2025 या हंगामाचा शेवट केला आणि आता येत्या 20 जूनपासून लीड्स येथे हिंदुस्थान आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला प्रारंभ होत असून या कसोटीने 2025-27 या कसोटी अजिंक्यपदाच्या नव्या हंगामाचाही प्रारंभ होतोय. त्यामुळे आगामी मालिकेबाबत क्रिकेट जगतातील दिग्गजांची मतेही विभागलेली समोर आली आहेत. इंग्लंडचा संघ मायदेशात खेळत असला तरी नव्या दमाचा हिंदुस्थानी संघच यजमानांवर मात करून मालिकेत 3-2 अशी बाजी मारेल, असा अंदाज हेडनने व्यक्त केल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. जेम्स अॅण्डरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड हे दोन्ही महान गोलंदाज गेल्याच मोसमात निवृत्त झाले आहेत. त्यामुळे इंग्लिशची गोलंदाजी काही कमकुवत झाल्याचे मत त्याने बोलून दाखवले.
मांजरेकर-दासगुप्ता म्हणाले, हिंदुस्थान हरणार
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कने आगामी मालिका अत्यंत चुरशीची होईल, हिंदुस्थानी संघ दोन सामनेही जिंकेल, पण मालिकेत यजमान इंग्लंडचा संघ 3-2ने यश मिळवेल, असे भाकीत वर्तवले आहे. त्याचप्रमाणे आफ्रिकन वेगवान गोलंदाज डेल स्टेननेही आपले मत इंग्लंडच्या पारड्यात 3-2 असे टाकलेय. एवढेच नव्हे तर, संजय मांजरेकर आणि दीप दासगुप्ता यांनी नव्या दमाचा हिंदुस्थानी संघ इंग्लंडला जबरदस्त झुंजवेल. इंग्लंडचा संघ आपल्या घरच्या मैदानात खेळत असल्यामुळे या मालिकेत तेच विजयी ठरतील, अशी भविष्यवाणी करत दोघांनी हिंदुस्थानी क्रिकेटप्रेमींना धक्का दिला आहे.