एकजुटीने मावलगाव गावकऱ्यांनी केली पानी टंचाईवर मात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, अहमदपूर

क्रांती…… तलवारीने नाहीतर चांगल्या विचारांनी आणि दृढ निश्चयाने घडते असे म्हटले जाते. याच विचाराने प्रेरित होऊन अहमदपूर तालुक्यातील मावलगावने बदलाचा मार्ग स्वीकारत गेल्या दोन वर्षात गावचा चेहरा मोहरा बदलला आहे. विविध प्रकारच्या श्रमदानातून व गावकऱ्याच्या कष्टातून आता आधुनिक बनले आहे.

मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती असताना पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असताना या भर उन्हाळ्यात एखादया गावला एक दिवस आड पाणी पुरवठा होत आहे. या परिस्थितीत ही किमया साधली आहे अहमदपूर तालुक्यातील मावलगाव या छोटयाशा गावातील गावकऱ्यांनी सामूहिक प्रयत्नातून करून दाखवून प्रशासन व जिल्ह्यात चर्चेचा विषय केला आहे. सुमारे 175 उबरे व 1600 लोकसंख्या असलेल्या या गावामध्ये गावकऱ्याच्या सामूहिक प्रयत्नातून अनेक उपक्रम बऱ्याच वर्षापासून राबवत आहेत. गावालगतच्या पाझर तलावात पाणी असता त्याचा वापर शेतीसाठी न करता गावकऱ्यांनी हे पाणी राखून ठेवले. परिणामी या पाण्यामुळे ह्या भीषण टंचाईत गावाला एक दिवस आड नळाद्वारे पाणी पुरवठा होत आहे. घर तेथे शोषखड्डा करून जमिनीत पाणी मुरवून पाणीटंचाईवर मात केली आहे. प्रत्येक घरी शौचालय बांधून गाव रोगराई पासून मुक्त केले आहे. कचरा कुंडी व या छोटयाशा गावात घंटागाडीची सोय केली आहे एक गाव एक स्मशानभूमी हा उपक्रम राबवून सर्व धर्म समभाव जोपासला आहे.

गावात ग्रामपंचायत चा माध्यातून अॅरो प्लॅट बसवला असून पाच रुपयात 20 लीटरचा पाण्याचा जार मिळत आहे. सर्व गाव सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या नजरेत आहे. गावातील प्रत्येक घराला गुलाबी कलर दिला असून गाव गुलाबी दिसत आहे गावातील भिंतीवर व दारावर म्हणी व सुविचार आहेत गावात 17 महिला बचत गटाची स्थापना असून गावात मुलीचा जन्मदर वाढवण्यासाठी गावात मुलगी जन्माला आली की मुलीच्या नावे दोन हजार रुपये बँकेत भरले जातात व विवाह योग्य झाली की तिच्या पाल्याला पैसे दिले जाणार आहेत. दर आठवड्याला गाव स्वच्छतेसाठी गावकरी श्रमदान करतात. गावात सुमारे एक हजार आंब्याची लागवड करण्यात आली आहे. प्रत्येक कुटुंबांने चार झाडाची जोपासना करून त्याची निगा राखणे असा सज्जड दम ग्रामपंचायतने दिला आहे. गावातील महिलांना एकमेकींशी संवाद साधता यावा व ग्रामपंचायतीच्या वतीने धोबीघाट सुरू केला. तळ्यामध्ये साबणाच्या पाण्याने पाणी घाण होते, म्हणून ही संकल्पना राबविली जिल्हयातील हा पहिला धोबीघाट तयार झाला.

गावात दोन वर्षापासून सार्वजनिक कुडबकुटी यंत्र बसवण्यात आले असून शेतकऱ्यांना मोफत कडबा कुटी करून मिळू लागला. गावच्या पुढाकारातून पिठाची गिरणी बसवण्यात आली असून त्याद्वारे मोफत दळण दिले जाते. ग्रामपंचायतचा कर हा शंभर टक्के भरायला हवा अशी अट असून दर गुढीपाडव्याच्या मुहर्तावर शंभर टक्के कर वसूल केला जातो. या करामार्फत ग्रामपंचायत सुविधा पुरवते. धोबी घाटाच्या सांडपाण्यावर 1000 झाडाची ठिबकच्या सहाय्याने लागवड केली आहे. प्रत्येक घरात देशी गाय असून त्यामुळे दुधासाठी हे गांव स्वंयपूर्ण आहे. गावातील सर्व चौकांना महापुरुषाची नावे देण्यात आली आहेत.