
सामना प्रतिनिधी । लातूर
आगामी विधानसभा निवडणुकीत मराठवाड्यात सर्वाधीक जागा शिवसेनेच्या आल्या पाहिजेत. आगामी मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल. राज्यात लोकांचा विश्वास फक्त शिवसेनेवरच आहे. सर्वांनी प्रामाणिकपणे काम करावे. पक्षाची शिस्त पाळावी, आई जगदंबेला स्मरण करुन शिवसेनेची सत्ता येण्यासाठी शपथ घ्या, असे आवाहन शिवसेना नेते तथा शिवसेनेचे जिल्हा संपर्कनेते खासदार चंद्रकात खैरे यांनी केले.
लातूर येथील शासकिय विश्रामगृहावर लातूर विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी, शिवसैनिक यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या प्रसंगी विधानसभा संपर्क प्रमुख शामराव पाचंगे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलताना खासदार खैरे यांनी सांगीतले की, मी मराठवाड्यातीलच आहे, त्यामुळे मला कोणीही खोटी आणि चूकीची माहिती देण्याचा प्रयत्न करु नका. मराठवाड्यात शिवसेनेच्या सर्वाधिक जागा निवडून आणण्याचे ध्येय आहे. त्यामुळे दसऱ्यानंतर पक्षप्रमुख उध्दव ठाकरे प्रत्येक मतदारसंघात फिरणार आहेत. सर्वांनी पक्षसंघटना बळकट करण्यासाठीच प्रयत्न करावेत. गट- तट सहन केले जाणार नाहीत. सर्वांनी पक्षाची शिस्त पाळणे आवश्यक आहे. पक्षशिस्त न पाळणाऱ्यांची गय केली जाणार नाही. तातडीने सदस्यता नोंदणी सुरु करावी. शिवसैनिकांचा ताकद काय असते ते आगामी निवडणूकीत सर्वांना दाखऊन द्यावे. ८० टक्के समाजकारण करणारी फक्त शिवसेनाच आहे. प्रत्येकांने आपला उमेदवार हा धनुष्यबाण आहे एवढेच लक्षात ठेवावे. शिवसेना सत्तेत येईल यासाठी आई जगदंबेला प्रार्थना करा आणि भक्कम संघटनात्मक बांधणी करुन यश मिळवा असे अवाहनही त्यांनी केले.
शिवसेनेसारखी निष्ठावंतांची फळी कुठेच नाही. दसऱ्यानंतर मराठवाड्यातील प्रत्येक मतदारसंघामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे स्वतः येणार आहेत, असेही खासदार चंद्रकांत खैरे यांनी सांगीतले. पदाधिकारी यांनी सर्वांना सोबत घेऊन काम करावे, खंडणी वसुलीचे काम करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, पक्षाची बदनामी करु नका असेही त्यांनी सांगितले.
या बैठकीत लातूर जिल्ह्याचे सहसंपर्कप्रमुख म्हणून अभय साळुंके याच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली. त्यांनी समन्वयकाची भुमिका घेऊन काम करावे असे आदेशही खासदार चंद्रकांत खैरे यांनी दिले. माजी नगरसेवक सुनिल बसपुरे यांनी आपल्या समर्थकांसह यावेळी शिवसेनेत पुन्हा प्रवेश घेतला. कार्यक्रमास शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, शिवसैनिक, युवा सैनिक, आजी, माजी पदाधिकारी यांची उपस्थिती होती.
























































