
>>निलय रमाकांत वैद्य
लेखिका चारुशीला निरगुडकर यांचं ‘तेजोमयी’ हे पुस्तक महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर ‘ग्रंथाली’ने प्रकाशित केलं. एका सूनबाईंनी आपल्या सासूबाईंच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचं विश्लेषण पुस्तकरूपात शब्दबद्ध केले आहे. यात रेखाटलले प्रसंग प्रत्येक स्त्रीला प्रेरणादायी ठरतील. मग ती स्त्री सासू असो, सून असो किंवा एखादी तरुण मुलगी असो. यातून प्रत्येकीसाठी बरंच काही शिकण्यासारखं आहे. 8 मार्चच्या ‘जागतिक महिला दिना’चे औचित्य साधून लेखिका चारूशीला निरगुडकर यांच्याशी या पुस्तकासंदर्भात केलेली बातचित.
तुम्ही ‘तेजोमयी’ हे पुस्तक सादर केलंत. याचं प्रयोजन काय?
– ‘तेजोमयी’ हे पुस्तक म्हणजे लीलाताई निरगुडकर यांचा जीवनपट आहे. लीलाताईंना जाऊन आता दहा वर्षे झाली. त्या केवळ एक व्यक्ती नसून अभिव्यक्ती होत्या. कमी शिक्षण, पण उत्तम व्यवहारज्ञानाचं त्या मूर्तिमंत उदाहरण होत्या. मायाळू आई, शिस्तप्रिय सासूबाई, मैत्रिणीसमान आईबाई, कलासक्त शौकिन, सांस्कृतिक क्षेत्रातल्या असंख्य दिग्गजांची ताई, गोरगरीब मुलामुलींना उदारहस्ते मदत करणारी शिक्षिका, कायमस्वरूपी कार्यमग्न, आजूबाजूच्या प्रत्येक व्यक्तीला अखंड ऊर्जा आणि प्रेरणा देणारा शक्तिस्रोत… अशा कितीतरी उपाध्या दिल्या तरी त्यांचं संपूर्ण व्यक्तिचित्र उभं राहणार नाही. अशा होत्या लीलाताई. आम्ही त्यांना ‘तुम्ही व्यक्ती नसून संस्था’ आहात असं नेहमी म्हणायचो. एका स्त्रीने कसं असावं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे लीलाताई. सहवासातल्या प्रत्येकाचं व्यक्तित्व कसं उजळून निघेल, याचा त्यांना नेहमी ध्यास लागलेला असायचं. असं एक आदर्श व्यक्तिचित्र मांडावं अशी तळमळ माझ्या मनात होती. माझी ही मानसिकता आणि त्यातून माझं व्यक्त होणं म्हणजे माझं ‘तेजोमयी’ हे पुस्तक.
एका सूनबाईंनी आपल्या सासूबाईंविषयी लिहिलेलं हे पहिलंच पुस्तक असावं…
– अशा प्रकारचं हे पहिलंच पुस्तक आहे. मला अनेकांनी सांगितलं की, सूनबाईने सासूबाईंवर लिहिलेलं पुस्तक आमच्या वाचनात तरी आतापर्यंत आलेलं नाही. त्यामुळे ‘तेजोमयी’ वैशिष्टय़पूर्ण ठरेल अशी मला खात्री वाटते. आपल्याकडे गमतीने म्हटलं जातं की, सून आणि सासू म्हणजे 36 चा आकडा. बऱ्याच घरात आपण पाहतो, दोघींमधून विस्तव जात नाही, पण माझा अनुभव वेगळा आहे. हा अनुभव आणि त्या अवतीभवती गुंफलेले प्रसंग म्हणजेच माझं पुस्तक आहे.
लीलाताईंसोबतचं तुमचं नातं नेमकं कसं होतं?
– त्यांची सून म्हणून माझा अनुभव निश्चितच वेगळा होता, तो मी पुस्तकात मांडला आहे, पण तो लीलाताई आणि मी या दोन व्यक्तींपुरता मर्यादित नाही. तो प्रातिनिधिक स्वरूपाचा आहे. एक आदर्श सासू कशी असावी याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे लीलाताई. मी त्यांच्या मार्गदर्शनाखाली सगळ्या गोष्टी शिकले. नव्या सूनबाईने कसं वागावं, कसं नव्या घरात स्थिरस्थावर व्हावं, सासरच्या मंडळींना कसं आपलंसं करावं, घर, मुलं सांभाळता सांभाळता कशी आपल्या नवऱ्याला त्याच्या उद्योगधंद्यात मदत करावी. मुलं मोठी झाल्यावर कसं स्वतःचं करीयर घडवावं या आणि अशा प्रकारच्या असंख्य गोष्टी मी त्यांच्याकडून शिकले. माझं लग्न झालं तेव्हा मी वीस-बाविशीची होते. मला तसा काही विशेष अनुभव नव्हता, मनात भीती होती, दडपण होतं. तेव्हा माझ्या सासूबाईंनी मला सगळय़ा गोष्टी शिकायला सुरुवातीची पाच वर्षे दिली. ती माझी उमेदवारीची वर्षे होती. तेव्हा मी सगळी कामं शिकून घेतली. त्या काळात लीलाताईंनी माझ्यावर कसलं दडपण येऊ नये म्हणून विशेष काळजी घेतली. त्यामुळे सुरुवातीचा काळ माझ्या आयुष्यातला सुवर्णकाळ होता. त्यावेळच्या संस्कारांमुळे मी नवऱ्याच्या व्यवसायात त्यांना मदत करू शकले. माझ्या मुलांवर संस्कार घडवू शकले. पुढे माझी शेतीच्या संशोधनाची आवड मी जोपासली. स्वतःचं सलोन उघडलं, केटरिंगचा व्यवसाय केला. फुलांच्या सजावटीचा उद्योग केला. इकेबाना जपानी फुलं सजावटीमध्ये प्रभुत्व मिळवलं. लेखन कला जोपासली. या प्रत्येक उपक्रमात मला सासूबाईंकडून प्रेरणा मिळाली. त्यांना माझ्या कर्तृत्वाचं कौतुक वाटायचं. माझे पती डॉ. सुधीर, दीर आणि जाऊबाई प्रतिभा निरगुडकर यांनी मला प्रोत्साहन दिलं, पण या सगळय़ा मंडळींचं नेतृत्व लीलाताई म्हणजे माझ्या सासूबाई करायच्या. म्हणून मला त्या वेगळय़ा वाटतात.
‘जागतिक महिला दिन’ निमित्ताने सर्व मराठी सासूबाईंना आणि सूनबाईंना काय कानमंत्र द्याल?
– जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मी इतकंच सांगू इच्छिते की, आपल्या समाजातील प्रत्येक मराठी संसार सुखाचा होवो ही माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. ‘तेजोमयी’ पुस्तक वाचल्यावर प्रत्येक स्त्रीला, मग ती सून असो, सासू असो किंवा तरुण मुलगी असो, प्रत्येक व्यक्तीला उत्स्फूर्तपणे एक रस्ता सापडेल. नातेसंबंधांची घट्ट वीण बांधण्यासाठी प्रेरणा मिळेल आणि कानमंत्र म्हणाल तर ‘श्रद्धा’ आणि ‘सबुरी’ हे दोनच शब्द मी सांगेन. या दोन शब्दांच्या कानमंत्रात अख्ख्या जीवनाचं सार सामावलेलं आहे. हे मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगते.
























































