
बसपा अध्यक्षा मायावती यांनी पुन्हा एकदा त्यांचा पुतण्या आकाश आनंद यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. आकाश यांना मुख्य राष्ट्रीय समन्वयक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. हे पक्षात दुसऱ्या क्रमांकाचे स्थान आहे. म्हणजेच मायावतींनंतर आता आकाश हे पक्षात मोठ्या पदावर आहेत. आकाश यांना आतापर्यंतचे सर्वात मोठे पद देण्यात आले आहे. पक्षाने पहिल्यांदाच मुख्य राष्ट्रीय समन्वयक पद निर्माण केले आहे. याआधी आकाश हे राष्ट्रीय समन्वयक होते.
दरम्यान, 16 महिन्यांत मायावतींनी आकाश आनंद यांना दोनदा राष्ट्रीय समन्वयक आणि उत्तराधिकारी बनवले होते. पण दोन्ही वेळा त्यांना पदावरून काढून टाकण्यात आले. आकाश यांना 3 मार्च रोजी पक्षातून काढून टाकण्यात आले होते. 40 दिवसांनंतर जाहीरपणे माफी मागितल्यानंतर मायावतींनी त्यांना पुन्हा पक्षात घेतले. तेव्हापासून त्यांना पक्षात मोठे पद मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. यानंतर आज आकाश यांना मुख्य राष्ट्रीय समन्वयक म्हणून नियुक्त करण्यात आले.