मायावतींचे ‘एकला चलो रे’! समाजवादी पार्टीबरोबरची युती तोडली

सामना ऑनलाईन, लखनौ

लोकसभा निवडणुकीतील पराभवामुळे कपाळावर हात मारून घेतलेल्या बसपाच्या नेत्या मायावती यांनी ‘एकला चलो रे’चा रस्ता धरला आहे. सोमवारी त्यांनी अखिलेश यादव यांच्या समाजवादी पार्टीबरोबरची युती तोडून पुढील सर्व निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याचे जाहीर केले.

लागोपाठ तीन ट्विट करत मायावती यांनी सोमवारी समाजवादी पार्टीवर जोरदार हल्ला चढवला. राज्यात सपा सरकारदरम्यान घेण्यात आलेल्या दलितविरोधी निर्णयांकडे दुर्लक्ष करत आम्ही देशहितासाठी युतीचा धर्म पाळला, परंतु लोकसभेच्या निकालानंतर सपाची भूमिका विचार करायला भाग पाडत आहे. पुढील निवडणुकांमध्ये सपाला सोबत घेऊन भाजपला हरवणे शक्य नाही असे मायावती यांनी स्पष्ट केले. त्यांनी यापूर्वी 4 जूनला उत्तर प्रदेशमध्ये स्वबळावर पोटनिवडणूक लढवण्याची भूमिका मांडली होती.

26 वर्षांपूर्वीसुद्धा होती युती

सपा आणि बसपाने यंदा 12 जानेवारीला युती करून लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. याआधी या दोन पक्षांमध्ये 26 वर्षांपूर्वी युती झाली होती. 1993 मध्ये हे पक्ष एकत्र आले होते. त्यावेळी बसपाची सूत्रे कांशीराम यांच्याकडे होती.