
सामना ऑनलाईन । मुंबई
पश्चिम उपनगरातील अक्सा ते मनोरीपर्यंत सर्व बीचवर आता एलईडी लाइटचा झगमगाट होणार आहे. यामुळे या सहा किनार्यांची शोभा आणि पर्यटकांची सुरक्षाही वाढणार आहे. शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून होणार्या या महत्त्वाकांक्षी सुशोभीकरणाच्या कामाचे लोकार्पण सोमवारी महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते करण्यात आले.
मुंबईतील किनार्यांवरील अंधारामुळे गैरप्रकार आणि पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. पालिकेने किनार्यांची सुरक्षा आणि सुशोभीकरणाचा उपक्रम हाती घेतला आहे. यासाठी अर्थसंकल्पात खास तरतूदही करण्यात आली आहे. ‘सुशोभित विद्युत रोषणाई प्रकल्पां’तर्गत हे काम करण्यात येत आहे. यामध्ये पश्चिम उपनगरातील अक्सा, सिल्व्हर, दानापानी, एरंगळ, मार्वे आणि मनोरी या सर्व बीचवर एलईडी लाइट लावण्यात आल्या आहेत. आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून याआधी जुहू चौपाटीवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. या विद्युत रोषणाई कामाच्या लोकार्पणप्रसंगी उपमहापौर हेमांगी वरळीकर, खासदार गोपाळ शेट्टी, स्थापत्य समिती अध्यक्षा साधना माने, नगरसेविका संगीता सुतार आदी उपस्थित होते.

मालाड पश्चिम येथील मढ सिल्व्हर, अक्सा, एरंगल, दानापानी या चौपाटय़ांवर विद्युत रोषणाई प्रकल्पाचे उद्घाटन महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते झाले. सोबत उपमहापौर हेमांगी वरळीकर, नगरसेविका संगीता सुतार, खासदार गोपाळ शेट्टी, विभागप्रमुख सुधाकर सुर्वे, संजय सुतार,कोळीनेते किरण कोळी आदी.
असे झाले काम
- समुद्र किनार्यांवर एलईडी लावल्यामुळे पर्यटकांना माहीत नसलेले किनारे ‘प्रकाशात’ येणार असून या किनार्यांवरील पर्यटन वाढणार आहे.
- या सुशोभीकरणात सहा समुद्र किनार्यांवर एकूण 198 खांब बसवण्यात येणार आहेत. यासाठी25 किमीचा समुद्रकिनारा आकर्षक रोषणाईने उजळून निघणार आहे. यासाठी पालिका 2.40 कोटींचा खर्च करणार आहे.
- यामध्ये अक्सा बीचवर 50 विद्युत खांब, मार्वे – 15, एरंगळला – 20, सिल्व्हर – 45, दानापानी – 22 तर मनोरी येथे 46 विद्युत खांब उभारण्यात आले आहेत.




























































