सीईटी सेलचे पुन्हा चुकीचे व्यवस्थापन

व्यवस्थापन अभ्यासक्रमांकरिता राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (सीईटी सेल) घेण्यात आलेल्या एमबीए सीईटीत तब्बल 28 प्रश्न सदोष असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या प्रत्येक सदोष प्रश्नाकरिता एक गुण द्यावा लागणार आहे. सीईटी सेलच्या या चुकीच्या व्यवस्थापनाचा मनस्ताप महिनाभरापूर्वी अभियांत्रिकी प्रवेशाकरिता इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांना सहन करावा लागला होता. एमएचटी-सीईटीतील गणिताच्या पेपरमधील 50 टक्के प्रश्न चुकीचे असल्याने परीक्षा पुन्हा घेण्याची नामुष्की सीईटी सेलवर आली होती. आता 1 ते 3 एप्रिल दरम्यान झालेल्या एमबीए-सीईटीत तब्बल 28 सदोष प्रश्न आढळून आले आहेत. राज्यभरातून जवळपास 253 विद्यार्थ्यांनी या प्रश्नांवर हरकत घेतली होती. त्यात सर्वाधिक तक्रारी (134) लॉजिकल रिझनिंगच्या प्रश्नांबाबच्या होत्या. त्या खालोखाल अबस्ट्रक्ट रिझनिंग (21), क्वांटीटेटीव्ह अॅप्टीटय़ुड (35), व्हर्बल ऑबिलिटीच्या (35) होत्या. आता प्रत्येक चुकीच्या प्रश्नांसाठी त्या बॅचेसमधील विद्यार्थ्याला एक गुण दिला जाणार आहे. सुधारित उत्तरपत्रिका उपलब्ध करून देण्यात आली आहे.