‘एमसीए’ला धर्मादाय आयुक्तालयाचा दणका, घटना वैधतेचा निकाल ठेवला प्रलंबित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

धर्मादाय आयुक्त कार्यालयात घटनेच्या वैधतेसंदर्भात सुरू असलेल्या कायदेशीर लढाईत महाराष्ट्र क्रिकेट संघटनेला (एमसीए) सोमवारी (दि.7) मोठा दणका बसला. (सीओए) घटनेतील परिशिष्ट (अ) नुसार सादर केलेली घटना ‘बीसीसीआय’च्या प्रशासन समितीकडून मंजूर करून आणावी असे निर्देश धर्मादाय आयुक्तांनी ‘एमसीए’ला दिले. त्यामुळे ‘एमसीए’च्या घटना वैधतेचा निर्णय आता प्रशासन समितीच्या कोर्टात गेलाय.

‘बीसीसीआय’ने आखून दिलेल्या निर्देशांनुसार घटना तयार केल्याबद्दल ‘एमसीए’ला आधीच कारणे दाखवा नोटीस मिळाली आहे. ‘एमसीए’ने विशेष सर्वसाधारण सभेत घटना मंजूर करून घेतल्यानंतर ती मंजुरीसाठी धर्मादाय आयुक्त कार्यालयात सादर केली होती, मात्र ही घटना तयार करताना सर्वोच्च न्यायालय व ‘बीसीसीआय’च्या प्रशासकीय समितीचे निर्देश पाळलेले नाहीत असे विरोधी गटाने धर्मादाय आयुक्तालयाच्या लक्षात आणून दिले होते, मात्र हे प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाही ‘एमसीए’ने ठरल्याप्रमाणे 2 ऑक्टोबरला आपली निवडणूक घेतल्याने विरोधक अधिकच आक्रमक झाल्याने हे घटना वैधतेचे प्रकरण आणखी चिघळले. त्या पार्श्वभूमीवर ‘तारीख पे तारीख’ पडल्यानंतर अखेर सोमवारी धर्मादाय आयुक्तालयाने ‘एमसीए’ला ‘बीसीसीआय’च्या प्रशासकीय समितीकडून घटना वैधतेची मंजुरी आणा असे निर्देश दिले.

पितळ उघडे पडणार!
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने घटना तयार करताना ‘बीसीसीआय’च्या प्रशासन समितीचे निर्देश पाळलेले नाहीत. त्यामुळे आम्ही पत्र लिहून ही बाब ‘बीसीसीआय’च्या प्रशासन समितीच्या लक्षात आणून दिली आहे. 9 किंवा 10 ऑक्टोबरपर्यंत आम्हाला ‘बीसीसीआय’कडून पत्राचा खुलासा मिळेल अशी अपेक्षा आहे. धर्मादाय आयुक्तालयानेही ‘एमसीए’ला ‘सीओए’कडून घटनेतील परिशिष्ट (अ) मंजूर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता ‘एमसीए’चे पितळ उघडे पडणार आहे अशी माहिती विरोधी गटातील ‘एमसीए’चे माजी अध्यक्ष बाळासाहेब थोरवे व माजी रणजीपटू अनिल वाल्हेकर यांनी दै. ‘सामना’शी बोलताना दिली.