मुंबईत 61 लाख रुपयांचे एमडी जप्त, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची कारवाई

सामना प्रतिनिधी, मुंबई

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खार पोलीस ठाण्यातील धडाडीचे पोलीस निरीक्षक दया नायक यांच्या पथकाने कारवाई करून 61 लाख रुपयांचे एमडी ड्रग जप्त केले आहे. निवडणुकीदरम्यान ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलले जाते. एमडी ड्रगप्रकरणी खार पोलिसांनी संजय कृष्णा पांडे, सचिन रमेश मुदलियार, रोशन विकासकुमार पांडेला अटक केली असून न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.

शहरात लोकसभा निवडणुकीदरम्यान काही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी मुंबई पोलिसांनी घेतली आहे. पोलिसांनी मोठय़ा प्रमाणात बंदोबस्त ठेवला आहे. तीन तरुण हे खारच्या नॅशनल कॉलेज परिसरात एमडी ड्रगची डिलिव्हरीसाठी येणार असल्याची माहिती खार पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीची शहनिशा करून अतिरिक्त आयुक्त मनोजकुमार शर्मा, परिमंडळ-9 चे पोलीस उपायुक्त परमजितसिंग दहिया यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त दिलीप काळे, वरिष्ठ निरीक्षक संजय मोरे, पोलीस निरीक्षक दया नायक, नंदकुमार गोपाळे, सहायक पोलीस निरीक्षक लोणकर, पोलीस निरीक्षक नरळे, पोलीस हवालदार पेडणेकर, तळेकर, पोलीस नाईक शिंदे, चव्हाण, साळवी, पवार, यादव, डबडे, तोरणे, पाटील, महिला पोलीस शिपाई क्षीरसागर यांच्या पथकाने बुधवारी सापळा रचला. नॅशनल कॉलेजजवळील बसस्टॉपजवळ तीन जण संशयास्पद फिरत असताना त्या तिघांना ताब्यात घेतले.

ड्रगची विक्री कोणाला
या तिघांकडून 1 किलो 526 ग्रॅम एमडी जप्त केले. जप्त केलेल्या एमडीची किंमत 61 लाख रुपये इतकी आहे. एमडी ड्रग बाळगल्याप्रकरणी त्या तिघांविरोधात एनडीपीएस कायद्याखाली गुन्हा दाखल केला. त्यांना अटक करून स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यांनी ड्रग कुठून आणले होते, आतापर्यंत कोणाला ड्रगची विक्री केली याचा तपास सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक दया नायक यांनी सांगितले. पोलीस निरीक्षक दया नायक यांनी यंदाच्या वर्षी कारवाई करून मोठय़ा प्रमाणात ड्रग पकडले आहे.

जामिनावर सुटताच पुन्हा करू लागला एमडीची विक्री
संजय पांडे हा अंधेरी परिसरात राहत असून तो एमडीचा मुख्य सप्लायर आहे. 2012 साली दिल्ली पोलिसांनी त्याला ड्रगच्या केसमध्ये अटक केली होती. जामिनावर सुटल्यावर तो मुंबईला आला. काही महिने शांत राहिल्यावर पांडे पुन्हा एमडीच्या काळ्या धंद्याकडे वळला. पांडेने तस्करी करता रोशनकुमार आणि सचिनची मदत घेतली. त्या दोघांनाही पैशाचे आमिष दाखवले. कमिशनपोटी ड्रग विक्री करता ते दोघे तयार झाले.