बॉलीवूडमध्ये काम मिळवण्यासाठीच नानाच्या क्लीन चिटची अफवा, तनुश्रीच्या वकिलांचा आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

‘मी टू ’प्रकरणी अभिनेते नाना पाटेकर याला क्लीन चिट दिल्याच्या बातम्या सध्या सगळीकडे व्हायरल होतायत, पण यात काही तथ्य नाही. नानाला अद्याप पोलिसांकडून क्लीन चिट मिळाली नसल्याचा खुलासा अभिनेत्री तनुश्री दत्ताचे वकील ऍड. नितीन सातपुते यांनी केला. मुंबईत शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मी टू प्रकरणामुळे नानाला बॉलीवूडमध्ये काही काम मिळत नाही. गेल्या 7 ते 8 महिन्यांपासून तो घरीच आहे. आपल्याला पुन्हा बॉलीवूडमध्ये काम मिळावे यासाठी त्यांच्या पीआर टीमकडून या अफवा जाणूनबुजून पसरवल्या जात असल्याचेही सातपुते म्हणाले.

साक्षीदारांना धमकावले जातेय
नानाकडून साक्षीदारांना धमकावले जात आहे. अभिनेत्री डेजी शहा या प्रकरणातील महत्त्वाची साक्षीदार आहे. डेजी आता अभिनेत्री झाल्यामुळे याप्रकरणी ती कितपत बोलेल अशी शंका आहे. पण ती सत्य सांगत नसेल तर आम्हाला कायदेशीर प्रक्रियांचा अवलंब करावे लागेल, असेही ते म्हणाले. साक्षीदारांची नार्को टेस्ट करावी याची मागणी आम्ही करणार असल्याचेही सातपुते म्हणाले.