
सामना ऑनलाईन । मुंबई
महाराष्ट्राच्या टेबल टेनिस खेळाडूंनी इलेव्हन स्पोर्टस् राष्ट्रीय रँकिंग स्पर्धेत (पूर्व विभाग) आपला चांगला फॉर्म कायम ठेवत पदकांची लयलूट कायम ठेवली. त्यामुळे आरजी बारुआ स्पोर्टस् कॉम्प्लेक्स इनडोअर स्टेडियम येथे पार पडलेल्या स्पर्धेत महाराष्ट्राच्या पदकसंख्येत आणखीन दोन रौप्य व दोन कांस्यपदकांची भर घातली गेली. राधिका सकपाळ व अक्षत जैन यांनी अनुक्रमे मुलींच्या कॅडेट व मुलांच्या कॅडेट गटात रौप्यपदकाची कमाई केली. तर गौरव पंचांगम व पृथी वर्तीकरने अनुक्रमे मुलांच्या कॅडेट व मुलींच्या सब-ज्युनियर गटात कांस्यपदक मिळवले. महाराष्ट्राने या स्पर्धेत दोन सुवर्ण, तीन रौप्य व दोन कास्य पदकांवर मोहोर उमटवलीय. मुलांच्या कॅडेट गटात अक्षत जैन व गौरव पंचांगम हे उपांत्यफेरीत एकमेकांविरुद्ध होते. अक्षतने पाच गेमपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या सामन्यात गौरवला नमवीत अंतिम फेरी गाठली. त्यामुळे गौरवला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.





























































