मेढा बाजारपेठेत 200 रुपयांच्या बनावट नोटांचा सुळसुळाट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मेढा बाजारपेठेत 200 रुपयांच्या बनावट नोटांचा सुळसुळाट झाला आहे. बाजारपेठेतील अनेक दुकानदार, व्यापाऱ्यांना बनावट नोटा देऊन अज्ञाताने फसवले आहे. याबाबत कोणीही मेढा पोलिसांत तक्रार दिलेली नाही.

रमेश काशिळकर यांच्या श्री किराणा स्टोअर्समधून पन्नास रुपयांची खरेदी करून संबंधित भामटय़ाने दोनशे रुपयांची नोट देऊन दीडशे रुपये परत घेतले. थोड्या वेळाने सुनील काशिळकर यांच्या दुकानातून याच भामटय़ांनी खरेदी करून दोनशे रुपयांची नोट दिली. मात्र, ही नोट बनावट असल्याचे सुनील काशिळकर यांच्या लक्षात आले. याबाबतची चर्चा बाजारपेठेत पसरताच आपलीही फसवणूक झाल्याचे इतर दुकानदारांच्या लक्षात आले. मुख्य बाजारपेठेतील पार्ट किराणा स्टोअर्स, महाकाली किराणा स्टोअर्स, खताळ स्वीट मार्ट, मोरे किराणा स्टोअर्स आदी अनेक व्यापाऱयांना या भामटय़ाने दोनशे रुपयांच्या बनावट नोटा देऊन फसविले आहे. बनावट नोटांचा प्रकार काहींच्या लक्षात येताच त्यांनी या भामटय़ाला गाठले. मात्र, आपण मोरावळे गावचे असून, साळुंखे नाव असल्याचे सांगून त्याने पोबारा केला. हा भामटा रमेश काशिळकर यांच्या दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱयात कैद झाला आहे. त्याने दिलेली दोनशे रुपयाची बनावट नोट खऱया नोटेसारखीच दिसते. या नोटेचा नंबर 95 केए 204495 असून, प्रमोद पार्टे यांना दिलेल्या दुसऱया नोटेवरही तोच नंबर आहे. याबाबत अद्याप कुणीही तक्रार दिली नाही. दरम्यान, फसवणूक झालेल्या व्यापारी, दुकानदारांनी मेढा पोलीस स्टेशनशी संपर्क करण्याचे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक अमोल माने यांनी केले आहे.