मीराबाई चानूला ऑलिम्पिकचे तिकीट, टोकियो ऑलिम्पिकमध्ये जिंकले होते रौप्यपदक

हिंदुस्थानची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने सोमवारी आयडब्ल्एूफ विश्वचषक स्पर्धेत महिलांच्या 49 किलो गटातील ‘ब’ गटात तिसरे स्थान पटकावत पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीट बुक केले. टोकियो ऑलिम्पिकमधील रौप्यपदक विजेत्या मीराबाईकडून देशवासीयांना आता आणखी एका पदकाची अपेक्षा असेल.

दुखापतीमुळे सहा महिन्यांनंतर पुनरागमन करणाऱया मीराबाई चानूने एकूण 184 किलो (स्नॅचमध्ये 81 किलो, तर क्लीन ऍण्ड जर्कमध्ये 103 किलो) वजन उचलले. तिची ही कामगिरी पॅरिस ऑलिम्पिकच्या पात्रतेसाठी पुरेशी ठरली. 2017 मधील जगज्जेती मीराबाई चानू महिलांच्या 49 किलो गटात ऑलिम्पिक पात्रता क्रमवारीत (ओक्यूआर) दुसऱया स्थानी आहे. चीनची जियान हुईहुआ अव्वल स्थानावर विराजमान आहे. ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या खेळाडूंची अधिकृत घोषणा विश्वचषक स्पर्धा संपल्यानंतर होणार आहे. प्रत्येक वजनी गटातील अव्वल 10 वेटलिफ्टर पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणार आहेत.
मीराबाई चानू हिने याआधी गतवषी सप्टेंबरमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभाग घेतला होता. या स्पर्धेत तिला दुखापत झाली होती. त्यावेळी मीराबाईला आपली सर्वोत्तम कामगिरी करता आली नव्हती, पण तिने पाच वेळा वजन उचलण्यात कुठलीच चूक केली नव्हती.

आपल्या सर्वोत्तम कामगिरीपासून मीराबाई दूरच

मीराबाई चानूने पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीट मिळविले असले तरी ती आपल्या सर्वोत्तम कामगिरीपासून खूपच दूर आहे. 29 वर्षीय या हिंदुस्थानी वेटलिफ्टरची स्नॅचमध्ये 88 किलो वजन ही सर्वोत्तम कामगिरी आहे. याचबरोबर 2021च्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत मीराबाईने क्लीन ऍण्ड जर्कमध्ये 119 किलो वजन उचलून तत्कालीन जागतिक विक्रम केला होता. मात्र, मीराबाई नुकतीच दुखापतीतून सावरलेली आहे. जुलैपर्यंत ती आपल्या सर्वोत्तम कामगिरीपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. मीराबाई चानू ही पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणारी एकमेव हिंदुस्थानी वेटलिफ्टर असेल. या हिंदुस्थानी खेळाडूची पॅरिस ऑलिम्पिक ही तिसरी ऑलिम्पिक स्पर्धा ठरणार आहे.