
मेरठमध्ये शुक्रवारी दुपारी एक मोठा अपघात झाला. दौराला येथे एका कोल्ड स्टोरेज अमोनिया गॅसच्या कॉम्प्रेसरचा स्फोट झाला. या स्फोटामुळे भिंत कोसळून सात जण ठार झाले. अपघाताच्या वेळी कोल्ड स्टोरेजमध्ये एकूण 27 मजूर काम करत होते, त्यापैकी 24 जण ढिगाऱ्याखाली दबले गेले. अपघाताची माहिती मिळताच पोलीस-प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. यावेळी एनडीआरएफला देखील पाचारण करण्यात आले. यात 12 जणांची सुटका करण्यात आली. मात्र सात जण मरण पावले. दरम्यान उधमपूर येथून ठेकेदाराला ताब्यात घेण्यात आले आहे.
दौराला येथील ओव्हरब्रिजजवळ माजी आमदार चंद्रवीर सिंह यांचे जनशक्ती कोल्ड स्टोरेज आहे. शुक्रवारी दुपारी 3 च्या सुमारास या कोल्ड स्टोरेजमध्ये 24 मजूर काम करत होते. तीन मजूर काही कामानिमित्त बाहेर गेले होते. यावेळी अचानक अमोनिया गॅसच्या कॉम्प्रेसरचा मोठा आवाज होऊन स्फोट झाला आणि इमारतीचा काही भाग कोसळला. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला.
या अपघातातून कसेबसे बाहेर पडून नऊ मजुरांचा जीव वाचला. बाकीचे ढिगाऱ्याखाली गाडले गेले. यात चौघांचा जागीच मृत्यू झाला तर रुग्णालयात नेत असताना तिघांचा मृत्यू झाला. जोरदार स्फोटामुळे सुमारे अर्धा किलोमीटरपर्यंत जमीन हादरली. आजूबाजूच्या अनेक दुकानांच्या काचा फुटल्या. बचावकार्यासाठी पोलीस व प्रशासकीय अधिकाऱ्यांचे पथकही घटनास्थळी पोहोचले. या ढिगाऱ्याखालून 12 जणांना बाहेर काढण्यात आले. या दुर्घटनेत सात जणांच्या मृत्यूला अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. पाच जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.




























































