वाईत भरला महापोळा! पंचवीस हजारावर बैलजोड्यांच्या गोरक्षनाथाला प्रदक्षिणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पोळा करीच्या दिवशी वसमत तालुक्यातील वाई येथील गोरक्षनाथांच्या दर्शनानंतर वर्षभर बैलांवर येणाऱ्या पिडा टळतात, अशी भावना असलेल्या शेतकऱ्यांनी शनिवारी सुमारे पंचवीस हजारावर बैलजोड्या आणल्या होत्या. वाई गोरक्षनाथाला प्रदक्षिणा घालून बळीराजाचे राज्य येऊ दे अशी प्रार्थना यावेळी शेतकऱ्यांनी केली. प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी वाई येथे हा महापोळा मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.

वसमत तालुक्यातील वाई गोरक्षनाथच्या दर्शनासाठी दरवर्षी पोळा सणाच्या दुसऱ्या दिवशी हिंगोली, परभणी, नांदेड या तीन जिल्ह्यातील तसेच मराठवाडासह विदर्भातील अन्य काही जिल्ह्यातील शेतकरी बैलजोड्यांना आणतात. यंदाही शनिवारी पहाटेपासूनच दर्शनासाठी बैलजोड्या दाखल होत होत्या. दिवसभरात सुमारे पंचवीस हजारावर बैलजोड्यांनी व शेतकऱ्यांनी गोरक्षनाथाचे दर्शन घेतल्याची माहिती संस्थानच्या वतीने देण्यात आली. गोरक्षनाथाला प्रदक्षिणा घातल्यानंतर वर्षभर बैलांवर येणाऱ्या पिडा, संकटे टळतात, अशी भावना शेतकऱ्यांची आहे. त्यामुळे पोळ्याच्या करीचा दिवस शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो. वाई येथे या सणास महापोळा म्हणून ओळखल्या जाते. शनिवारीही पहाटेपासून सायंकाळपर्यंत बैलजोड्या वाईत दाखल होत होत्या. दिवसभरात सुमारे पंचवीस हजार बैलजोड्यांनी गोरक्षनाथाला प्रदक्षिणा घालून दर्शन घेतले. यादरम्यान शेतकऱ्यांना फराळाचे वाटपही करण्यात आले.

महापोळ्यासाठी वाई गोरक्षनाथ संस्थानचे अध्यक्ष दुलबाराव कदम, सचिव बाबुराव कदम, श्यामराव कदम, सटवाराव मगर, मारोतराव कदम, संभाजी निर्मळ, रावसाहेब निर्मळ, सरपंच नरहरी पांचाळ, नानाराव मगर, माणिकराव कदम, गुलाबराव कदम, बालाजी मगर, गोविंदराव कदम, सुलभाजी बोडखे, विठ्ठल कदम, निवृत्ती कदम, रूस्तूमराव मगर, सुधाकर कदम, संभाजी निर्मळ, साहेबराव कुंभार, मारोतराव कदम यांच्यासह वाई व परिसरातील गावातील ग्रामस्थांनी प्रयत्न केले. वाई परिसर बैलजोड्या व शेतकऱ्यांच्या गर्दीने फुलुन गेला होता. नारळ व प्रसाद विक्रीची दुकाने देखील थाटण्यात आली होती.