मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

मुंबई रेल्वे लोकल सेवेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर आज रविवारी मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. मध्य रेल्वेवर ठाणे आणि मुंब्रा स्थानकामध्ये सकाळी ८.३० ते सायंकाळी ५.३०पर्यंत मेगाब्लॉक घेतला जाईल. डाऊन दिशेकडील धीम्या लोकल कळवा आणि मुंब्रा दरम्यान नवीन मार्गावर वळवण्याचे काम करण्यासाठी हा ब्लॉक घेतला जाणार आहे. पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचा हा भाग असून त्यामुळे या कालावधीत लोकल सेवा खंडित राहिल. ब्लॉकपूर्वी ठाण्यातून डाऊन दिशेला सकाळी ७.५९ आणि अप मार्गावर सकाळी ८.१२ वाजता लोकल सुटेल.

मध्य रेल्वे

मुलुंडहून सुटणाऱ्या सर्व जलद लोकल सकाळी ८.२२ ते सायंकाळी ५.१२पर्यंत जलद मार्गावर वळवण्यात येतील. त्यानंतर त्या दिवा स्थानकातून पुन्हा धीम्या मार्गावर वळवल्या जातील. या लोकल कळवा आणि मुंब्रा स्थानकात थांबणार नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सुटणाऱ्या अर्धजलद लोकल सकाळी ९.१८ ते सायंकाळी ५पर्यंत दिवापर्यंत जलद मार्गावर चालतील. त्यानंतर धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. या लोकल कळवा, मुंब्रा स्थानकात थांबणार नाहीत.

सीएसएमटीहून सुटणाऱ्या जलद, अर्धजलद लोकल सकाळी ८.४७ ते सायंकाळी ४.४५पर्यंत कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड, दिवा स्थानकातही थांबतील. ठाण्याहून सुटणाऱ्या सर्व जलद, अर्धजलद लोकल सकाळी ९.०७ ते दुपारी ४.०२पर्यंत दिवा, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला स्थानकात थांबतील. सकाळी ८ ते सायंकाळी ७पर्यंत सर्व लोकल सुमारे १० मिनिटे उशिराने धावतील. ब्लॉक कालावधीत काही फेऱ्या रद्द होणार आहेत. या कालावधीत सीएसएमटी ते ठाण्यापर्यंत विशेष फेऱ्या चालवल्या जातील.

हार्बर रेल्वे

हार्बर मार्गावर उद्या, रविवारी सकाळी ११.१० ते दुपारी ४.१०पर्यंत ब्लॉक चालेल. सीएसएमटी ते पनवेल/बेलापूर/वाशीपर्यंतच्या सेवा सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३९पर्यंत आणि सीएसएमटी ते पनवेल/बेलापूर/वाशीपर्यंत सकाळी १०.२१ ते दुपारी ३.४१पर्यंत लोकल सेवा खंडित राहील. या कालावधीत सीएसएमटी ते कुर्ला आणि वाशी ते पनवेलदरम्यान विशेष फेऱ्या चालवल्या जातील.

summary- mega block for central and harbor route