आज तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

563

रेल्वेच्या तांत्रिक कामांसाठी तसेच ट्रॅक आणि सिग्नल यंत्रणेच्या देखरेखीसाठी रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवर मरिन लाइन्स ते माहीम डाऊन धिम्या मार्गावर, मध्य रेल्वेवर कल्याण ते ठाणे अप जलद मार्गावर तर हार्बरवर पनवेल ते वाशी दोन्ही मार्गावर मेगा ब्लॉक असणार आहे.

पश्चिम रेल्वे
मरिन लाइन्स ते माहीम दरम्यान अंधेरीच्या दिशेनं जाणाऱ्या धिम्या मार्गावर ब्लॉक असणार आहे. त्यामुळे या मार्गावरील लोकल डाऊन जलद मार्गावर धावतील. रविवारी सकाळी 10.35पासून ते दुपारी 3.35पर्यंत विरार दिशेकडील धिम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर धावतील. यावेळी महालक्ष्मी, प्रभादेवी, माटुंगा रोड येथे लोकलला थांबा देण्यात येणार नसल्याची माहिती रेल्वेतर्फे देण्यात आली आहे. प्रवाशांना वांद्रे आणि मुंबई सेंट्रल स्थानकांतून प्रवास करण्याची मुभा आहे.

मध्य रेल्वे
मध्य रेल्वेच्या कल्याण ते ठाणे अप जलद मार्गावर रविवारी ब्लॉक असणार आहे. यावेळी सीएसएमटी दिशेकडील जलद मार्गावर सकाळी 10.54 पासून ते दुपारी 3.52 पर्यंत मेगाब्लॉक असेल. या दरम्यान कल्याणहून सीएसएमटी दिशेकडील जलद मार्गावरील लोकल धिम्या मार्गावर चालवण्यात येणार आहे. या सर्व लोकल ठाणे स्थानकापर्यंत थांबतील. मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा या स्थानकात जलद लोकल थांबतील. यावेळी लोकल फेऱ्या सुमारे 20 मिनिटे आणि मेल एक्स्प्रेस 30 मिनिटे उशीराने धावणार आहेत. रविवारी रत्नागिरी ते दादर पॅसेंजर एक्स्प्रेस दिवा स्थानकापर्यंत चालवण्यात येईल. त्यानंतर दिवा स्थानकातूनच ही एक्स्प्रेस रत्नागिरीकडे रवाना होईल.

हार्बर रेल्वे
पनवेल ते वाशी दोन्ही दिशेकडील हार्बर मार्गावर आणि बेलापूर/ सीवूड-खारकोपर मार्गावर सकाळी 11.30 ते दुपारी 4.01 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. प्रवाशांच्या सुविधेसाठी सीएसएमटी-वाशी मार्गावर विशेष फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. सकाळी 10.03 पासून ते दुपारी 3.16 वाजेपर्यंत सीएसएमटीहून पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या लोकल रद्द करण्यात येतील. तसेच ठाणे ते पनवेल ट्रान्स हार्बर मार्गावरील फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. ठाणे ते वाशी, नेरूळ या ट्रान्स हार्बरवर लोकल धावणार आहेत. नेरूळ, बेलापूर ते खारकोपर दोन्ही मार्गावरील लोकल फेऱ्या रद्द असणार आहेत. तसंच पनवेल ते अंधेरी स्थानकांदरम्यानची सेवा सुद्धा रद्द असणार आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या