निमित्त- न्यू जर्सीच्या ‘मराठी विश्व’ची मंगळागौर

>> मेघना साने

‘मराठी विश्व’ हे न्यू जर्सीमधील सर्वात मोठे महाराष्ट्र मंडळ. मराठी विश्वने नाटय़ संमेलन, साहित्य संमेलन, वसंतोत्सव असे अनेक कार्यक्रम यशस्वी करून दाखवले. आता या मंडळाने केवळ महिलांसाठी मंगळागौर हा खास कार्यक्रम आयोजित केला होता. यामागे आपली महाराष्ट्रीयन सणांची, व्रतवैकल्याची परंपरा जपावी असा उद्देश होता. या कार्यक्रमाला अमेरिकावासी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

आपण या श्रावण महिन्यात मंगळागौरीच्या खेळांचा कार्यक्रम करणार आहोत’ अशी पोस्ट ‘मराठी विश्व’च्या सभासद महिलांना पाठवल्यावर लगेच त्यांच्या प्रतिक्रिया आल्या. ‘हो, हो नक्कीच करूया.’ ‘मराठी विश्व’च्या बोर्ड ऑफ डिरेक्टर रूपाली गुणे सांगत होत्या. काही महिलांनी त्यासाठी गाणी सुचवली. यातील काहींची महाराष्ट्रात असताना मंगळागौर झाली होती. त्यांनी आपल्याला खेळ येत असल्याचे सांगितले. आता अमेरिकेत हे सर्व मैत्रिणींबरोबर अनुभवायला मिळणार याचा त्यांना आनंद होत होता. कमिटीचा उत्साह वाढला. किती बायका यात समाविष्ट होऊ शकतील याचा अंदाज घेतला तर दीडशे ते दोनशे बायका यायला तयार होत्या. रूपाली यांनी कार्यक्रमाचे आयोजन करायला सुरुवात केली.

‘मराठी विश्व’ हे न्यू जर्सीमधील सर्वात मोठे महाराष्ट्र मंडळ आहे. 2022 मध्ये या मंडळाने BMM अधिवेशनाचे यजमानपद जबाबदारीने पार पाडले होते. मराठी विश्व दरवर्षी गणपती दिवाळी, स्वरधारा, साहित्य कुंज, वसंतोत्सव असे कार्यक्रम करत असते. त्याबरोबरच व्यावसायिक संगीत आणि नाटकांचे प्रयोगही आयोजित करते. आता रूपाली गुणे यांनी केवळ महिलांसाठी मंगळागौर हा खास कार्यक्रम आयोजित केला होता. यामागे आपली महाराष्ट्रीयन सणांची, व्रतवैकल्याची परंपरा जपावी असा उद्देश होता.

हा उपक्रम आयोजित करण्यापूर्वी मंगळागौर म्हणजे नेमके काय हे समस्त स्त्रियांना माहीत असले तरी त्यांनी अधिकची माहिती घेतली. मंगळागौर हे नवविवाहित महिलांनी करण्याचे व्रत अजूनही महाराष्ट्रात केले जाते. मंगळागौर ही श्रावणातील मंगळवारी करतात. शिव आणि पार्वती यांच्याकडे अत्यंत प्रेम असलेले दांपत्य म्हणून पाहिले जाते. मंगळागौर करताना शिव आणि गणपतीसह पार्वतीची पूजा केली जाते. रात्रभर खेळ खेळले जातात. सकाळी या पूजेची सांगता होते. हे सर्व समजून घेत मंगळागौरीचे आयोजन सुरू झाले.
या उपक्रमात सहभागी होण्यासाठी एकूण दीडशे ते दोनशे बायका तयार झाल्या. सर्वांनी पारंपरिक पोषाख करायचे ठरले. एरव्ही
ऑफिसमध्ये शर्ट पॅन्ट घालून जाणाऱया बायका उत्साहाने नऊवारी, पाचवारी आणि पारंपरिक दागिने घालून आल्या होत्या. सर्वांना खेळ शिकविण्यासाठी स्वयंसेवक बायकांची एक टीम होती. समारंभाचे पावित्र्य कायम राखण्यासाठी ‘जय देवी मंगळागौरी’ या आरतीने सुरुवात करायचे ठरले. मग स्वागत समारंभ झाला. स्वयंसेविका टीमने एका गाण्यावर नृत्य करून दाखविले. त्यात ‘नाच ग घुमा’, ‘फू बाई फू’ या खेळांची बायकांनी भरपूर मजा घेतली. तीन हातांची फुगडी, सहा हातांची फुगडीसुद्धा केली. बायकांनी सूपसुद्धा नाचवले.

‘पण सूप आणले कुठून? अमेरिकेत सूप मिळते तरी का?’ मी उत्सुकतेने विचारले.

‘आमच्या सभासद बायका म्हणजे काय हुशार आणि कल्पक आहेत.’ रूपाली मॅडमने सांगितले. ‘कार्डबोर्डचा लांबट बॉक्स घेऊन त्याचे सूप बनवले. त्याची छान सजावट केली होती. स्वयंसेविका बायका घागरी घेऊनसुद्धा नाचल्या. तसेच ‘का गं, का गं’ असे भांडायला लाटण्याच्याऐवजी बायकांनी दांडिया घेतल्या होत्या.’ नाचासाठी रूपाली आणि टीमने यूटय़ूबवरून पारंपरिक गाणी शोधून ठेवली होती.

नाच गं घुमा, कशी मी नाचू?
या गावचा त्या गावचा, सोनार नाही आला,
बुगडी नाही मला, कशी मी नाचू?

‘या गाण्यावर सर्वांनी खेळ खेळले. काही बायका लग्नानंतर पाच-दहा वर्षांनी अमेरिकेत आल्या होत्या. त्यांची महाराष्ट्रात मंगळागौर झाली होती. त्यांना हे खेळ माहीत होते. या खेळांनी त्यांच्या महाराष्ट्रातील आठवणी जागृत झाल्या आणि एकूण खेळामुळे सर्वत्र उत्साही वातावरण निर्माण झाले. आश्चर्य म्हणजे शंभर वर्षांपूर्वीची ही गाणी! त्यावर आजच्या अमेरिकेतील बायका आनंदाने, उत्साहाने नाचत होत्या. आमच्या या सभासद महिलांमधली एक मुलगी नुकतंच लग्न होऊन अमेरिकेत आली होती. तेव्हा ‘इथेच माझी मंगळागौर झाली आहे’ असे ती आनंदाने म्हणाली.’

‘गंमत तर पुढेच आहे.’ रूपाली सांगू लागल्या. ‘मी हे जे सगळे सांगितले ते झाल्यावर बायकांनी उखाणेदेखील घेतले. तेही पारंपरिक बरं का!’ गमतीदार उखाण्यांमुळे कार्यक्रमाचा शेवटही हसत खेळत झाला. उदा.
मराठी विश्वने केला मंगळागौरीचा थाट
मला जाऊ द्या ना घरी… पाहताहेत वाट

यानंतर जेवणात पुरणपोळी आणि मसालेभात असा हिंदुस्थानी पद्धतीचा मेनू होता. त्यामुळे एकूणच कार्यक्रम रसभरीत झाला. केवळ बायकांसाठीच असा हा कार्यक्रम असला तरी साऊंड सिस्टीम सेट करण्यासाठी, संस्थेचे खजिनदार मंदार केळकर यांची खूप मदत झाली हे रूपाली यांनी आवर्जून सांगितले.

‘आम्ही अमेरिकेत राहायला आलो. आमचे नातलग हिंदुस्थानातच राहतात. एकटे वाटू नये म्हणून आम्ही सर्व महिला एकमेकांशी नातलगासारख्या वागत असतो. नाते जडलेल्या या सर्व मैत्रिणींनी एकत्र येऊन ही मंगळागौर साजरी केली. तो दिवस खूप आनंदाचा होता.’ अशीच सर्व जणींची भावना होती.

[email protected]