मेहुल चोक्सीने अमेरिकेलाही लावला चुना! लॅबमधले हिरे अस्सल म्हणून विकले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । न्यू यॉर्क

पंजाब नॅशनल बँकेला 13 हजार कोटींचा चुना लावून पळणाऱ्या हिरे व्यापारी मेहुल चोक्सी याने अमेरिकेलाही चुना लावल्याचं समोर आलं आहे. मेहुलने लॅबमध्ये बनलेले हिरे अस्सल म्हणून विकल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे.

इंडियन एक्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेतील न्यायालयाने मेहुल चोक्सीच्या मालकीच्या सॅम्युअल ज्वेलर्सविरोधात चौकशीचे आदेश दिले होते. या चौकशीनंतर कोर्टासमोर धक्कादायक खुलासा झाला. चोक्सी ब्रिटीश व्हर्जिन आयलँड येथे स्थित असलेल्या एका प्रयोगशाळेत हिरे बनवत होता. हा सगळा प्रकार अतिशय गोपनीय राखला जात होते. त्यासाठी त्याने सॅम्युअल ज्वेलर्सची मूळ कंपनी गीतांजली जेम्स लिमिटेडच्या वचन पत्राच्या हवाल्याने पंजाब नॅशनल बँकेच 139 कोटींचं कर्जंही उचललं होतं.

चोक्सी प्रयोगशाळेत बनलेल्या नकली हिऱ्यांना अस्सल हिऱ्यांसारखी ब्रँड व्हॅल्यू, कट्स आणि खोटं प्रमाणपत्रंही देत होता. त्यामुळे ते नकली हिरेही अस्सल हिऱ्यांच्या किमतीला विकले जात होते. अगदी दुर्मीळ हिरा आहे, असं सांगून चोक्सी तो अधिक किमतीला विकत असे. वास्तविक तो हिरा प्रयोगशाळेत बनलेला असे आणि त्याची उत्पादन किंमत ही विक्री किमतीच्या 5 ते 10 टक्के इतकीच असायची, असंही स्पष्ट झालं आहे.