संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज यात्रोत्सव अर्थात पौषवारीसाठी राज्यभरातून सुमारे साडेसातशे दिंड्या सोमवारी सायंकाळपर्यंत त्र्यंबकेश्वरनगरीत पोहोचल्या होत्या. उद्या मंगळवारी षट्तिला एकादशी हा यात्रोत्सवाचा मुख्य दिवस असून, पहाटे महापूजा होणार आहे. हे निवृत्तीनाथांचे सप्तशतकोत्तरी सुवर्ण महोत्सवी जन्म वर्ष असून, दिंड्यांची संख्या सहाशेवरून साडेसातशेवर पोहोचली आहे. हजारो वारकर्यांची उपस्थिती, टाळ-मृदंगाचा गजर आणि संत-हरिनामाच्या जयघोषाने शहर, परिसर भक्तीरसात न्हाऊन निघाले आहे.
श्री निवृत्तीनाथ महाराज यांच्या संजीवन समाधी मंदिरासह संपूर्ण त्र्यंबकेश्वरनगरी वारकरी बांधवांच्या उपस्थितीने नाथांच्या भक्तीत तल्लीन झाली आहे. निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थानच्या वतीने रविवारी पौष कृष्ण नवमीपासून पौषवारी महोत्सवाला सुरुवात झाली. चतुर्दशी म्हणजेच ९ तारखेपर्यंत मंदिरात दररोज पहाटे काकडा आरती, पूजन; सायंकाळी हरिपाठ, रात्री कीर्तन होत आहे. उद्या षट्तिला एकादशी हा यात्रोत्सवाचा मुख्य दिवस असून, राज्यभरातून लहान-मोठ्या दिंड्या त्र्यंबकेश्वरमध्ये पोहोचल्या आहेत. संस्थानच्या वतीने या दिंड्यांच्या मानकर्यांचे स्वागत करण्यात आले. पंढरपूर येथून येणारी मानाची दिंडी दुपारीच नाथांच्या नगरीत दाखल झाली. संस्थानकडील परंपरागत अशा नोंदणी झालेल्या दिंड्यांची संख्या 468 आहे. मागील वर्षी सुमारे सहाशे दिंड्या महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून आल्या होत्या. यंदा श्री निवृत्तीनाथ महाराज यांच्या सप्तशतकोत्तरी सुवर्ण महोत्सवी जन्मवर्षी दिंड्यांची संख्या सुमारे साडेसातशेवर पोहोचली आहे. सायंकाळपर्यंत सर्वच दिंड्या आल्याने येथे भक्तीमय वातावरणाची अनुभूती येत होती.
येथे मंगळवारी मध्यरात्री संस्थानच्या वतीने महापूजा होणार असून, पहाटे पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न होईल, अशी माहिती विश्वस्त प्रा. अमर ठोंबरे यांनी दिली. पौषवारीनिमित्त संस्थान, नगरपरिषदेने तयारी पूर्ण केली आहे. परिवहन महामंडळाने जादा बसेस सोडल्या आहेत. पोलीस, गृहरक्षक दलाचे कर्मचारी असा बंदोबस्त तैनात आहे.
View this post on Instagram