ICC ODI Ranking – गोलंदाजांमध्ये जोफ्रा आर्चरची जोरदार मुसंडी; फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल पाचमध्ये टीम इंडियाच्या खेळाडूंचा दबदबा कायम

ICC ने जाहीर केलेल्या वनडे क्रमवारीमध्ये इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने 16 स्थानांची जोरदार मुसंडी मारली आहे. दक्षिण आफ्रेकिविरुद्ध खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत त्याने दमदार गोलंदाजी करत 8 विकेट घेतल्या होत्या. याचा त्याला चांगलाच फायदा झाला आहे. दुसरीकडे फलंदाजांच्या क्रमवारीत टीम इंडियाच्या फलंदाजांचा दबदबा कायम आहे.

दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यामध्ये खेळल्या गेलेल्या वनडे मालिकेत दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडचा 2-1 अशा मालिका पराभव केला होता. दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू केशव महाराजाने या मालिकेत जबरदस्त गोलंदाजी करत 8 विकेट घेतल्या होत्या. त्यामुळे त्याला गोलंदाजांच्या क्रमवारीत त्याच्या पहिल्या स्थानाला धक्का लागला नाही. मात्र जोफ्रा आर्चरने 16 स्थानांची झेप घेत तिसरा क्रमांक पटकावला आहे. या क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर श्रीलंकेचा महेश थीकशन आणि चौथ्या क्रमांकावर टीम इंडियाचा कुलदीप यादव आहे. जोफ्रा आर्चरमुळे कुलदीप यादव तिसऱ्या स्थानावरून चौथ्या स्थानावर घसरला आहे. तसेच वनडे क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर शुभमन गिल, दुसऱ्या क्रमांकावर रोहित शर्मा, तिसऱ्या क्रमांकावर बाबर आझम आणि चौथ्या क्रमांकावर विराट कोहलीचा समावेश आहे. फलंदाजांच्या क्रमवारीत इंग्लंडच्या फलंदाजांना फायदा झाला आहे. तसेच वनडे अष्टपैलू खेळाडूंमध्ये झिम्बाब्वेचा सिकंदर रझा पहिल्या क्रमांकावर कायम आहे.