व्यापाऱयाचे अपहरण करून 60 लाखांची खंडणी घेतल्याप्रकरणी समतानगर पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा नोंद केला. त्याचा समांतर तपास गुन्हे शाखेचे पोलीस करत आहेत.
तक्रारदार व्यावसायिकाची गाडी सिग्नल येथे उभी राहिली तेव्हा दोन जण अचानक त्यांच्या गाडीत शिरले. एकाने चापूचा धाक दाखवून चालकाला गाडी दहिसरच्या दिशेने घेण्यास सांगितली. मागे बसलेल्या एकाने व्यावसायिकाला चापूचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी दिली तेव्हा तक्रारदार यांनी आपल्याला का त्रास देतात अशी विचारणा केली. फरार आरोपीने चालकाला गाडी दहिसर चेकनाका येथे उभी करण्यास सांगितली. पत्नी आणि मुले जिवंत हवी असल्यास 5 कोटींची खंडणी द्यावी लागेल, असे त्यांना सांगितले तेव्हा एवढे पैसे नसल्याचे तक्रारदार यांनी सांगितले. त्यानंतर त्या दोन फरार आरोपींनी तक्रारदाराला मारहाण केली.
पत्नी आणि मुलाची काळजी असल्याने 20 लाख रुपये देतो असे त्यांना सांगितले. मात्र फरार आरोपीने 60 लाखांची खंडणी मागितली. भीतीपोटी तक्रारदार यांनी गाडी त्यांच्या घराजवळ घेतली. त्यांच्या पत्नीला पह्न करून पैशाची बॅग खाली आणण्यास सांगितली. त्यानंतर फरार आरोपींनी पैशाची बॅग त्याने घेतली. पोलिसात तक्रार दाखल केल्यास पत्नी आणि मुलांचे बरेवाईट होईल अशी धमकी देऊन ते दोघे निघून गेले. भीतीपोटी त्यांनी हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. अखेर त्यांनी समतानगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी दोन जणांविरोधात गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.