
सामना प्रतिनिधी । मुरुड
लातूर जिल्ह्यातील मुरुड येथील पानमटेरियलचा व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यास आणि त्याच्या मुलास रात्री ९.५० वाजण्याच्या सुमारास चाकूचा धाक दाखवून लुटण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी अज्ञात मोटारसायकलस्वाराविरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे मुरुड शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.
या प्रकरणी मुरुड पोलीस ठाण्यात शफीक यासीन तांबोळी यांनी तक्रार दाखल केली. त्यांचे पान मटेरियलचे दुकान आहे. ते बंद करुन ते रात्री घराकडे आपल्या मुलासह मोटारसायकलवरून जात होते. यावेळी युनीकॉन मोटारसायकलवरुन आलेल्या अज्ञात व्यक्तीने त्यांच्या मोटारसायकलसमोरच आपली मोटारसायकल उभी करुन त्यांना थांबवले आणि चाकूचा धाक दाखवून त्यांच्या जवळील २ लाख ५० हजार रुपयांची बॅग हिसकावून घेतली आणि फरार झाला. तातडीने शफिक तांबोळी यांनी मुरुड पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि या घटनेची माहीती पोलीसांना दिली. मुरुड पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक भालेराव हे करीत आहेत.































































