
सांगली येथील व्यापारी लातुरात व्यवसायाच्या निमित्ताने आला होता. लातुरातील काम संपवून आपण सांगलीसाठी निघत असल्याचे मोबाईलवरून त्याने आपल्या मुलास कळवले, परंतु तो सांगलीत परत पोहोचलाच नाही. सर्वत्र शोधाशोध करूनही त्याचा शोध लागला नाही. या प्रकरणी गांधी चौक पोलीस ठाण्यात त्याच्या हरवल्याची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सांगली येथील गुरुनाथ इराण्णा किरणगी (48) हे 11 ऑगस्ट रोजी लातूर येथे आलेले होते. लातुरच्या आडत बाजारातील काम संपवून त्या दिवशी त्यांनी दुपारी 1 वाजता आपल्या मुलास फोनवरून लातूरचे काम संपलेले असून मी सांगलीसाठी निघत आहे, असे कळवले आणि नंतर त्यांचा मोबाईल बंद झाला. ते सांगलीला पोहचलेच नाहीत. मुलाने मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण संपर्क झाला नाही. सर्वत्र शोध घेऊनही ते सापडले नाहीत. म्हणून लातुरातील गांधी चौक पोलीस ठाण्यात श्रीमंत बसवंत पाटील यांनी त्यांच्या हरवल्याची नोंद केली.
गायब झालेल्या गुरुनाथ इराण्णा किरणगी हे लातुरातील एका लॉजवर थांबलेले होते, पण त्या दिवशी सकाळी 9 वाजता त्यांनी लॉज सोडले होते तसेच पहिल्या दिवशी 50 हजार आडतीवरून उचल घेतलेली होती. 30 लाख रुपये व्यवहार त्यांनी केलेला होता, असे तपासात निष्पन्न झाले आहे. अद्याप त्याचा शोध लागला नाही.
























































