
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच कमळीने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना त्रास देण्यास सुरुवात केली आहे. बोंगाव येथे सभेला जाण्यासाठी त्यांनी हेलिकॉप्टर बुक केले होते, मात्र ऐनवेळी ते रद्द झाल्याचे ममतांना कळविण्यात आले. हा प्रकार म्हणजे राजकीय घातपात असून माझ्याशी पंगा घ्याल तर देशभरात तुमची पाळेमुळे हादरवून सोडेन, तुम्हाला उखडून फेकेन, असा इशारा ममता बॅनर्जी यांनी आज भाजपला दिला. पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या ‘एसआयआर’वरून त्यांनी निवडणूक आयोगावरही जोरदार टीकास्त्र सोडले.
ममता बॅनर्जी यांची उत्तर 24 परगणा जिह्यातील बोंगाव येथे सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ममतांनी जंगी रॅली काढली. त्यानंतर ‘एसआयआर’वरून टीका करताना ममता म्हणाल्या की, या प्रक्रियेमुळे 35 जणांचा मृत्यू झाला आहे. निवडणूक आयोग आता भाजप आयोग झाले आहे. ते दिल्लीतून मिळणाऱ्या सूचनांचे पालन करते. भाजप कोटय़वधी रुपये खर्च करेल आणि केंद्रीय संस्थांचाही गैरवापर करेल, पण तरीही माझ्यासोबत भाजप राजकीय लढा लढू शकत नाही. भाजपने बंगालमध्ये माझ्या वाटय़ाला जाऊ नये. नाही तर मी देशभरात त्यांची पाळेमुळेच हादरवून सोडेन. जखमी वाघ हा जास्त धोकादायक असतो, असा इशारा ममतांनी भाजपला दिला. मतुआबहुल भागातील मतदारांनी स्वतःला ‘सीएए’अंतर्गत विदेशी जाहीर केले, तर त्यांची नावे मतदार यादीतून तत्काळ काढून टाकण्यात येतील, पण कोणत्याही खऱया मतदाराचे नाव हटणार नाही, असे ममता म्हणाल्या.
एवढ्या घाईघाईत ‘एसआयआर’ का?
पंतप्रधान नरेंद्र मोदींना 2024मध्ये याच मतदार याद्यांच्या आधारे मते मिळाली होती. जर या मतदारांचे नाव हटविले तर केंद्र सरकारलादेखील हटवायला हवे. एवढय़ा घाईघाईत एसआयआर का करण्यात येत आहे, असा सवाल ममतांनी यावेळी केला.
बिहारमध्ये विरोधकांना भाजपचा गेम कळला नाही
बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल हा ‘एसआयआर’चा परिणाम असल्याचा पुनरुच्चार ममतांनी केला. त्या म्हणाल्या की, विरोधी पक्षांना भाजपने ‘एसआयआर’च्या आडून खेळलेला गेम कळला नाही.






























































