मे महिना भलताच ‘ताप’दायक, हवामान खात्याने वर्तवला अंदाज

यंदा मार्चच्या सुरुवातीपासून उष्णतेने संपूर्ण देशाला हैराण केले आहे. तापमानाने सलग दोन महिन्यांत अनेकदा विक्रमी पातळी गाठली. त्यातच मे महिनाही भलताच ‘ताप’दायक असेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. महाराष्ट्र, गुजरातसह 14 राज्यांत उष्णतेची लाट धडकणार आहे. या राज्यांना किमान 2 ते 7 दिवस उष्णतेच्या लाटांच्या झळा सोसाव्या लागणार असल्याचे हवामान खात्याच्या शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.

गेल्या आठवड्यात जागतिक हवामानशास्त्र संघटनेने तापमानवाढीबाबत अनेक देशांना सावधगिरीचा इशारा दिला होता. त्यापाठोपाठ भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) मे महिन्यातील उष्णतेच्या तीव्रतेबाबत भाकीत केले आहे. पुढील महिनाभर देशाच्या अनेक भागांतील तापमान सरासरीपेक्षा अधिक असेल.

महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, हरयाणा, पंजाब, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिसा, छत्तीसगढ, तेलंगणा आणि कर्नाटक या राज्यांत किमान 2 ते 7 दिवसांपर्यंत उष्णतेची लाट असेल, असे आयएमडीचे प्रमुख मृत्युंजय मोहपात्रा यांनी जाहीर केले. महिनाभरात कमाल तापमान सरासरीपेक्षा चार अंशांनी अधिक असणार आहे. त्यामुळे नागरिकांना दिवस-रात्री उकाड्याचा त्रास सहन करावा लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अवकाळीमुळे लाहीलाही

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, 2 ते 8 मे या आठवडाभराच्या कालावधीत देशाच्या काही भागांत अवकाळी पाऊस पडू शकतो. वातावरणात काही काळ गारवा निर्माण होईल. मात्र पुन्हा तापमानात मोठी वाढ होऊन नागरिकांच्या अंगाची प्रचंड लाहीलाही होणार आहे.

एप्रिलमधील कहर

एप्रिलमध्येही उष्णतेने प्रचंड कहर केला. राज्यस्थान आणि गुजरातच्या काही भागांत 6 ते 11 दिवस उष्णतेच्या लाटा राहिल्या. तसेच महाराष्ट्रात विदर्भातील जिह्यांना 4 ते 6 दिवस उष्णतेच्या लाटांचा सामना करावा लागला. राजस्थानला सर्वाधिक उष्णतेच्या लाटांनी हैराण केले.