
मीरा-भाईंदरमध्ये जे. कुमार या ठेकेदाराकडून निष्काळजीपणे मेट्रोचे काम सुरू आहे. यामुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाल्याचा ठपका ठेवून एमएमआरडीएने ठेकेदाराला पाच लाखांचा दंड ठोठावला आहे. याआधीही मेट्रोचे काम सुरू असताना गर्डरवरून ३० किलोचा लोखंडी जॅक खाली पडला होता. त्यामुळे एमएमआरडीएने ठेकेदाराला १० लाखांचा दंड ठोठावला होता. आता दुसऱ्यांदा ठेकेदाराला दंड ठोठावला आहे.
दहिसर ते भाईंदर पश्चिम या मार्गावर मेट्रो ९ चे काम सुरू आहे. या कामाचा ठेका जे. कुमार ठेकेदाराला देण्यात आला आहे. काम सुरू असताना ठेकेदाराकडून नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घेतली जात नसल्याचे आढळून आले आहे. यामुळे अनेकवेळा अपघात झाले आहेत. या अपघातात काहींचा मृत्यु तर काही जण जखमी झाले आहेत. भाईंदर पूर्व मेडतिया नगर येथे काही दिवसापूर्वी मेट्रो कामादरम्यान वेल्डिंगचे काम करत असताना वाहनचालकांच्या अंगावर आगीच्या ठिणग्या पडल्या होत्या. यासंबंधी अॅड. कृष्णा गुप्ता यांनी एमएमआरडीएकडे तक्रार केली होती. या तक्रारीनंतर एमएमआरडीएने जे. कुमार ठेकेदाराला ५ लाखांचा दंड ठोठावला आहे. वारंवार हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदार जे. कुमार यांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी अॅड. कृष्णा गुप्ता व गो ग्रीन फाऊंडेशन ट्रस्टने केली आहे.
निकृष्ट कामे
मेट्रोचे काम करत असताना रस्त्याची देखभाल, दुरुस्ती करण्याची जबाबदारी ठेकेदाराची आहे. ठेकेदाराने काशिमीरा नाका ते भाईंदर गोल्डन नेस्ट रस्ता बनवला आहे. हा रस्ता निकृष्ट आहे. तसेच मेट्रो मार्गिकेखाली दोन उड्डाणपूल बनवले आहेत. या उड्डाणपुलावरदेखील अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत.




























































